औरंगाबाद : खाम नदीच्या पायथ्याशी असलेल्या मकाईगेट, महेमूदगेट, बारापुल्लागेट येथील पुलांचे आयुष्य संपले आहे. स्ट्रक्चरल आॅडिटनंतर हे तिन्ही पूल धोकादायक असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. यानंतरही मागील दहा वर्षांपासून तिन्ही पुलांवरून वाहतूक सुरू आहे.
राज्य शासनाने पुलांच्या डागडुजीसाठी आणि गेट सुरक्षित करून बायपास रस्ता तयार करण्याची घोषणा केली. मात्र, आजपर्यंत औरंगाबादपर्यंतनिधीच पोहोचला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छावणी, नंदनवन कॉलनी, बेगमपुरा, मकबरा परिसरातील विविध वसाहतींना ये-जाकरण्यासाठी मकाईगेट, महेमूदगेट, बारापुल्लागेटचा वापर करावा लागतो. या भागात ये-जा करण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ताच नाही.
छावणीतून ये-जा करणे कोणालाही सोयीचे नाही. दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने तिन्ही पुलांच्या डागडुजीसाठी आणि बायपास रस्ता तयार करण्यासाठी १७ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. हा निधी महापालिकेपर्यंत पोहोचलाच नाही. अलीकडेच एका राजकीय पक्षाने पुलांसाठी निधी आणल्याची घोषणा केली. मागील साडेचार वर्षांमध्ये हा निधीही आला नाही. निवडणुका येताच निव्वळ आश्वासनांचा पाऊस पाडण्यात येतो. नागरिकांनाही घोषणेची अंमलबजावणी होईल, असे दरवेळी वाटते. मात्र, निवडणुका संपल्यावर हासुद्धा एक ‘जुमला’होता असे लक्षात येते.
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्तदररोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी या तिन्ही गेटमध्ये वाहतुकीची कोंडी होते. एक मोठे वाहन आले तर किमान दहा ते पंधरा मिनिटे वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागते. नागरिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड कंटाळा आला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने मागील अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे.