फुलंब्री ( औरंगाबाद) : जळगाव राष्ट्रीय महामार्गावर चौकाघाटामध्ये दोन दिवसांपासून एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावर उभा आहे. तर आज एक एसटी बस अचानक बंद पडल्याने मार्गावरील वाहतूक व्यवस्था तीन तास ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी चार ते पाच किमी लांबपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
फुलंब्री-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरणचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी पुलाचे काम होणे बाकी आहे. या राखादेलेल्या महत्वाच्या मार्गाकडे राजकीय नेत्यांसह संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, चौका घाटात गेल्या दोन दिवसांपासून एक ट्रक ( एमपी १२ एच ०४४९) नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. त्यात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान एक एसटी बस अचानक बंद पडली. परिणामी दोन्ही बाजूने रस्ता बंद झाला. यामुळे सकाळी १० वाजेपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत या मार्गावर वाहतक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानंतर वाहतूक पोलीस आले. वाहतून सुरळीत करण्यात पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली.
महत्वाच्या मार्गाकडे होतेय दुर्लक्ष औरंगाबाद -जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. एकतर रस्त्याची अनेक ठिकाणी कामे सुरु असताना नादुरुस्त वाहने रस्त्यावरच उभी आहेत. त्या वाहनांना तात्काळ बाजूस करणे आवश्यक होते. स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीसांनी याकडे लवकर लक्ष दिले असते तर वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला नसता.