औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयात तीनशे ते चारशे रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयातील खाटांची संख्या ११७७ आहे. मात्र, प्रत्यक्षात पंधराशेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत आहेत. अनेकांना जमिनीवर अंथरुणावरच उपचार घ्यावे लागत आहेत.
आंतररुग्ण विभागात किमान रोज शंभर रुग्ण दाखल होतात. शासनाच्या धोरणाप्रमाणे तीन रुग्णांमागे एक परिचारिका असते; परंतु घाटीत एक परिचारिका किमान ६ ते ७ रुग्णांची सेवा करीत आहे. यामुळे परिचारिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा तर रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
घाटी रुग्णालयात प्रसूती विभागाच्या वॉर्डासह अनेक वॉर्डांत गाद्यांवर (फ्लोअर बेड) रुग्णांना उपचार करण्याची वेळ येत आहे. यामध्ये प्रसूती विभागात दाखल होणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेता येथे त्यापेक्षा अधिक व्यवस्था केलेली आहे. अनेकांना जमिनीवर अंथरुणावरच उपचार घ्यावे लागत आहेत. आहे त्या परिस्थितीत घाटीतील डॉक्टर, परिचारिका रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करतात.
रेफर करू शकत नाहीखाटांच्या तुलनेत तीनशे, चारशे रुग्ण अधिक येत आहेत. रुग्ण अधिक येतात, पण त्यांना आम्ही बाहेर रेफर करू शकत नाही. खाटांच्या प्रमाणाऐवजी रुग्णांच्या प्रमाणात परिचारिकांची संख्या वाढली पाहिजे. रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)