ज्ञानेश्वर चोपडे
आळंद : जिद्द, परिश्रमाबरोबरच अत्याधुनिक पद्धतीने शेती केल्यास मातीमधूनही सोने पिकविता येते. याचा प्रत्यय फुलंब्री तालुक्यातील ऊमरावती येथील तरुण शेतकरी गणेश श्रीरंग खमाट यांना आला आहे. एक एकर क्षेत्रात तीनशे क्विंटल अद्रकीचे उत्पादन घेण्याची किमया गणेश खमाट यांनी केली आहे.
गणेश खमाट यांची वडीलोपार्जित सहा एकर जमीन आहे. या जमिनीत ते मका, कपाशी व इतर पारंपरिक पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र, पारंपरिक पिकांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी यंदा अनोखा प्रयोग केला. यावर्षी प्रथमच एक एकर मुरमाड जमिनीवर अद्र्कच्या नऊ क्विंटल बेण्याची मे महिन्यात लागवड केली. एक एकर क्षेत्रात त्यांनी ४० बेडवर अद्र्कची लागवड केली. वेळोवेळी खत, औषध फवारणी, पाणी व्यवस्थापन व मशागत केल्याने अद्र्कीचे पीक जोमात आले. यासाठी गणेश खमाट यांना आळंद येथील प्रभाकर सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर कुटुंबातील सर्व सदस्यांची मोलाची मदत मिळाली. लागवड केलेल्या एका एकरातील ३५ गुंठा अद्रकची काढणी केली. २७६ क्विंटलचे विक्रमी उत्पादन झाले.
शेतकऱ्यांसमोर उभा केला आदर्श
शेती परवडत नाही असे म्हणत शेतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकरी वर्गासमोर गणेश खमाट यांनी एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
सर्व खर्च वजा दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गणेश खमाट यांनी एक एकरमध्ये नऊ क्विंटल बेण्याची लागवड केली. ३५०० रुपये दराने त्यांनी बेण्याची गावातील एका शेतकऱ्याकडून खरेदी केली. लागवडीच्या अगोदर त्यांनी दोन हजाराच्या दराने १० ट्रॉली शेणखत टाकले. औषधी, खते व इतर सर्व मिळून त्यांना एक लाख ३० हजार रुपये खर्च लागला. व्यापाऱ्याने १२०० रुपये क्विंटल दराने अद्रकची खरेदी केली. त्यातून तीन लाख एकतीस हजार रुपयांचे उत्पन्न झाले. खर्च वजा करून देखील त्यांना मोठे उत्पादन मिळाले आहे. एका बेडमधून सरासरी साडेआठ क्विंटल अद्र्क निघाल्याने अवघ्या ३५ गुंठ्यांत त्यांना २७६ क्विंटल उत्पादन निघाले. अद्याप पाच गुंठ्यात अद्र्क लागवडीसाठी ठेवली आहे. त्यात सरासरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल उत्पन्न निघेल असा अंदाज आहे.
--------------
कोट
माझ्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेतजमीन असून या जमिनीत मी मका, कपाशी व इतर पारंपरिक पीक घेत होतो. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पन्न हातात येत नसल्याने पिकांचा बदल म्हणून यावर्षी अद्रकची एक एकरमध्ये लागवड केली. लागवडीनंतर तीन वेळा मिश्रखते, ठिबक द्वारे सहा वेळा तर सात वेळेस औषधांची फवारणी केली. योग्य नियोजन, खत व औषधीच्या व्यवस्थापनामुळे पहिल्याच प्रयत्नात एक एकर पैकी ३५ गुंठ्यात २७६ क्विंट्लचे उत्पन्न निघाले. अद्याप ४० ते ४५ क्विंटल अद्र्क काढण्याचे बाकी आहे. - गणेश श्रीरंग खमाट, शेतकरी
-------
फोटो : दोन (शेतकरी गणेश खमाट इन्सेट)