भोकरदन : भोकरदन तालुक्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. भोकरदन - सिल्लोड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला.या बाबतची माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान संतोष भगवान पवार (१८) व संगीता भगवान पवार (४६, रा़ वजीरखेडा ता. भोकरदन) हे दुचाकीने (एमएच २१ डब्ल्यू ६७९१) सिल्लोडकडे जात होते. दरम्यान सिल्लोडकडून भोकरदनकडे येणाऱ्या बस (एमएच २० डी ९८८१) ने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील संतोष पवार व त्याची आई संगीता भगवान पवार हे गंभीर जखमी झाले. याच वेळी भोकरदनकडून सिल्लोडकडे जाणाऱ्या दुचाकीने (एमएच २१- २५७४) सुध्दा हुल दिल्याची माहिती समोर आली आहे़ यावेळी विजय चिंंचपुरे व इतरांनी जखमीना भोकरदन येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी दोघांनाही मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या सदस्या शिलाताई फुके, माजी सभापती गणेश फुके, अशोक पवार, पंढरीनाथ पवार यांच्यासह अनेकांनी रूग्णालयात येऊन मृताच्या नातेवाईकाचे सांत्वन केले. या प्रकरणात बसचालका विरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ दरम्यान, गत काही दिवसांपासून भोकरदन ते सिल्लोड हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. (वार्ताहर)भोकरदन : खराब रस्त्त्यामुळे घेतला बळीभोकरदन ते पिंपळगाव रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे. दानापूर ते सुरंगळी फाटा हा रस्ता तीन महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर आता पर्यन्त पाच ते सहा अपघात झाले आहेत़ १६ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान प्रकाश जाधव (४०) व पंचफुलाबाई प्रकाश जाधव (३८) हे दोघे पती- पत्नी दुचाकीवर पिंपळगाव रेणुकाईकडे जात असताना पाण्याच्या पाटाजवळ या रस्त्याच्या कामावरील टिप्परने या दुचाकीला धडक दिली.या अपघातात पंचफुलाबाई प्रकाश जाधव (३८) ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पंचफुलाई जाधव यांचे निधन झाले. त्यानंतर दानापूर, भायडी येथील ग्रामस्थांनी संबंधित गुत्तेदारा विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. टिप्पर चालकाला अटक करण्यासाठी पंचफुलाबाई जाधव यांचा मृतदेह भोकरदन पोलिस ठाण्यात आणला होता. त्यानंतर टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन अपघातांत तीन ठार
By admin | Published: May 16, 2016 11:34 PM