छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात प्रवेशद्वारावरच रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी करून दररोज दोन ते तीन किलो तंबाखूच्या पुड्या जप्त केल्या जात आहेत.
घाटी रुग्णालयात ठिकठिकाणी तंबाखू खाऊन रुग्णांच्या नातेवाइकांकडून भिंती रंगविल्या जातात. यावर आळा घालण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सर्जिकल इमारतीच्या प्रवेशद्वारावर रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षारक्षकांकडून त्यांची अंमलबजावणी केली जात असून, रुग्णांना भेटण्याच्या वेळी प्रत्येक नातेवाइकाचे खिसे तपासले जातात.
यावेळी अनेक नातेवाइकांकडे तंबाखूच्या पुड्या आढळतात. या पुड्या सुरक्षारक्षकांकडून जप्त केल्या जातात. दररोज किमान दोन ते तीन किलो पुड्या जप्त होत असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, सुरक्षारक्षकांकडून जप्त करण्यात येणाऱ्या तंबाखूच्या पुड्यांची महापालिकेच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाते. नातेवाइकांनी घाटी परिसरात अस्वच्छता करता कामा नये.