सिल्लोड : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे नवरात्रीनिमित्त निघणाऱ्या आजूबाईच्या स्वारीला जाणाऱ्या दुचाकीवरील मजुरांना भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याने दोन मित्रांचा जागेवरच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील लिहाखेडी फाट्याजवळ शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. समाधान अवचितराव आघाडे (वय ४१), काशिनाथ गोविंदा पांढरे (वय ४५, दोघे रा. उपळी, ता. सिल्लोड), विकास रामभाऊ सोनवणे (वय २५, रा. अन्वा, ह. मु. उपळी) अशी मृतांची नावे आहेत.
उपळी येथील समाधान आघाडे, काशिनाथ पांढरे व विकास सोनवणे हे तीन मित्र शनिवारी रात्री आठ वाजता दुचाकीने (एमएच. २०, एआर. ७०२५) अन्वा येथे आजूबाई देवीच्या स्वारीसाठी जात होते. रात्री ९ वाजता लिहाखेडी फाट्याजवळ समोरून आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात समाधान आणि विकास यांचा जागीच मृत्यू झाला. तर काशिनाथ हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता समाधान व विकास यांना मृत घोषित केले तर काशिनाथचा सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ११:३० वाजता मृत्यू झाला. या अपघाताची अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे करत आहेत.
मयत तिघेही मजूरया घटनेतील तिन्ही मयत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काशिनाथ यांच्याकडे एक एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, एक भाऊ असा परिवार आहे. तर समाधान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. त्यांच्या आईचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. विकास हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. काशिनाथ यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी दीड वाजता पूर्णा नदी तिरावरील स्मशानभुमीत तर समाधान व विकास यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता अंजना नदी तिरावरील स्माशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.