औरंगाबाद : दुकानात माल भरण्यासाठी बँकेतून काढलेले तीन लाख रुपये घरी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील पैशाची बॅग दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना ७ जून रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास हर्सूल गावात घडली. याविषयी हर्सूल पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, हर्सूल येथील धनगर गल्लीत राहणारे प्रल्हाद मोरे हे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. व्यवसायासाठी हडकोतील अॅक्सिस बँकेने त्यांना सात लाख रुपये कर्ज मंजूर केले आहे. दुकानात माल भरण्यासाठी शुक्रवारी दुपारी त्यांनी बँकेतून रोख तीन लाख रुपये काढले. ही रक्कम घेऊन कारने हर्सूल गावातील धनगर गल्लीच्या कोपºयावर गेले. तेथे कार उभी केल्यानंतर एका हातात मोबाईल, चार्जर आणि दुसºया हातात तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पायी घरी जात होते.
त्यावेळी दुचाकीस्वारांपैकी एक जण पायी चालत त्यांच्या दिशेने आला आणि अचानक त्याने मोरे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावू लागला. यावेळी मोरे यांनी बॅग हातात घट्ट पकडून ठेवल्याचे पाहून आरोपीच्या दुसºया साथीदाराने मोरे यांना जोराचा धक्का दिल्याने त्यांच्या हातातील बॅग आरोपीच्या हातात आली.
यानंतर ते तीन लाखांची रोकड घेऊन दुचाकीने तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक अमोल देशमुख, कर्मचारी शिवाजी झिने, राजेद्र साळुंके, कल्याण चाबूकस्वार यांनी घटनास्थळी धाव घेऊन नाकाबंदी केली. मात्र, तोपर्यंत दुचाकीस्वार पसार होण्यात यशस्वी झाले.
बँकेपासून होते मागावरपैशाच्या बॅगा लुटणारे हे परप्रांतीय टोळीतील आरोपी असावेत, असा संशय पोलिसांना आहे. आरोपी हे बँकेपासून मोरे यांच्या मागावर असावेत. मात्र, रस्त्यात त्यांना त्यांचे पैसे उडविता आले नाहीत. शेवटी ते त्यांच्या घरापर्यंत गेले आणि तीन लाख रुपये लुटून घेऊन गेले. बँक ते हर्सूलपर्यंतच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.