तुळजापूर : आई राजा उदोऽऽ उदोऽऽ चा गजर, संबळाच्या निनादात जवळपास तीन लाखाून अधिक भाविकांनी रविवारी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ दुर्गाष्टमी आणि रविवारच्या सुटीमुळे जवळपास तीन लाखाहून अधिक भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावली होती़ सर्वच रस्ते भाविकांनी फुलले होते तर गर्दीवर नियंत्रण मिळविताना प्रशासनाचीही मोठी दमछाक झाल्याचे दिसून आले़यंदाच्या नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे मोठे सावट दिसून आले़ प्रतीवर्षी पाच ते सहा लाख भाविकांची संख्या नवरात्रोत्सवात राहत असतानाही ही संख्या दैनंदिन सरासरी एक ते दीड लाखांच्या आसपास गेली होती़ रविवारी मात्र, दुर्गाष्टमी आणि रविवारच्या सुटीमुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली़ घाटशीळ मार्गावरील दर्शन रांगेतही भाविकांची गर्दी झाली होती़ पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी भाविकांना घाटशीळ मार्गावरील दर्शन रांगेकडे जाण्याचे आवाहन केले जात होते़ मात्र, तरीही महाद्वारासमोरही अनेक भाविकांनी गर्दी केली होती़ भाविकांची वाढलेली गर्दी पाहता शिखर दर्शनासाठी भाविकांना राजे शहाजीराजे महाद्वारातून सोडण्यात आले होते़ भाविकांची वाढलेली गर्दी पाहता या गर्दीवर नियंत्रण मिळविताना प्रशासनाच्या नाकी नऊ आल्याचे दिसून आले़ महाद्वारातून आतमध्ये सोडल्याने भाविकांना शिखर दर्शन घेवून वेळेत बाहेर पडता आले़ तर व्यवसायिकांनाही प्रशासनाच्या या निर्णयामुळे काहीसा लाभ झाल्याचे दिसून आले़ देवी दर्शनानंतर कुंकू, प्रसाद, परडी, कवड्याची माळ, पोत, खेळण्यांसह इतर साहित्य करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती़
तीन लाखावर भाविक
By admin | Published: October 10, 2016 12:18 AM