औरंगाबाद : मोबाईल लुटण्यासाठी रेल्वेप्रवासी स्वप्नील शिवाजी राठोड याला धावत्या रेल्वेतून खाली ओढून पाडून त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना (अल्पवयीन तरुणांना) उस्मानपुरा पोलिसांनी शनिवारी दुपारी ताब्यात घेतले. स्वप्नीलचा लुटलेला मोबाईलही त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, तपोवन एक्स्प्रेसने गावी जाणारा प्रवासी स्वप्नील शिवाजी राठोड (१९, रा. माळतोडी, ता. मंठा, जि. जालना) याचा मोबाईल लुटण्यासाठी उस्मानपुरा परिसरातील रेल्वे रूळ परिसरात तीन मुलांनी स्वप्नीलला रेल्वेतून खाली ओढले. शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या या घटनेत धावत्या रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, मोबाईल लुटणाऱ्या गँगच्या दहशतीखाली रेल्वेप्रवासी प्रवास करीत आहेत.
शुक्रवारच्या घटनेत तीन मुलांनी स्वप्नीलचा मोबाईल हिसकावताना स्वप्नीललाच रेल्वेगाडीतून खाली ओढले. या घटनेत स्वप्नीलचा अंत झाला. रेल्वेतून ओढल्याने खाली पडणाऱ्या प्रवाशाचा जीव जाऊ शकतो, हे या तरुणांना माहिती आहे, असे असताना त्यांनी केवळ एका मोबाईलसाठी स्वप्नीलला रेल्वेतून खाली ओढले आणि त्याचा जीव घेतला. या घटनेनंतर पसार झालेल्या तिन्ही संशयितांना सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, कर्मचारी संतोष सिरसाट, संजयसिंग डोभाळ यांच्या पथकाने शनिवारी शोधून काढले.
या त्रिकुटातील प्रमुख गयब्या (रा. उस्मानपुरा,मिलिंदनगर) याचे वय साडेसतरा वर्षे आहे. तो पोलिसांच्या रेकार्डवरील विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. चोऱ्या, लुटमार आणि हाणामारीचे १७ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, तर अन्य दोघांपैकी एक पंधरा वर्षांचा (रा. छोटा मुरलीधरनगर), तर तिसरा मुलगा (रा. नागसेननगर) सतरा वर्षांचा आहे.