औरंगाबाद : केवळ २ ते ३ हजार रुपयांसाठी शहराच्या वेगवेगळ्या भागातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या तरुणासह त्याच्या जालना येथील दोन साथीदारांना शहर गुन्हे शाखेने बुधवारी (दि.१३) रात्री अटक केली. यात दोन सख्खे भाऊ आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
सुनील रतनलाल पाखरे (रा. मुकुंदवाडी ), गोकुळ लहू जाधव आणि रणजीत लहू जाधव (दोघे रा.अंबड रोड ,जालना )अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखडे म्हणाले की, पुंडलिकनगर परिसरातील मोटारसायकल चोरीचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चासकर आणि उपनिरीक्षक पवन इंगळे हे त्यांच्या पथकातील सहायक फौजदार नजीर पठाण, नजीर शेख, सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, संदीप बिडकर, नितीन धुळे यांच्यासह करीत होते. त्यांनी संशयावरून आरोपी पाखरेला बुधवारी ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली देत जालना येथे राहणाऱ्या जाधव बंधूंच्या मदतीने शहरात दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. जाधव बंधू त्याला मोटारसायकल आणून देण्याचे सांगत. आरोपी पाखरे शहराच्या वेगवेगळ्या भागातून मोटारसायकल चोरी करून त्यांना नेऊन देई. त्याबदल्यात त्याला दोन ते तीन हजार रुपये जाधवकडून मिळत. अशाप्रकारे त्याने पुंडलिकनगर, सिडको पोलीस ठाणे, क्रांती चौक आणि मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीतून पाच मोटारसायकल चोरून जाधव बंधूंना नेऊन दिल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेच जालना येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ठेवलेल्या मोटारसायकली पोलिसांच्या हवाली केल्या.
===========
चौकट
मोटरसायकलींचा बदलला रंग
औरंगाबाद शहरातून चोरलेल्या मोटारसायकली आरोपी जाधव बंधू विक्री करण्याच्या तयारीत होते. याकरिता त्यांनी दुचाकीला वेगवेगळ्या रंगाचे पट्टे मारले. शिवाय दुचाकीवर राष्ट्रपुरुषांचे आणि देवतांची नावे लिहिली. दुचाकी विक्री होण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली.