फुलंब्री : तालुक्यातील सरपंच पदाची संख्या वाढविण्यासाठी आणि सर्वाधिक गावातील सत्ता आपल्याच पक्षाच्या हाती मिळावी म्हणून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. धामणगावच्या सरपंचपदावर तर चक्क शिवसेना, भाजपा व कॉंग्रेसच्यावतीने दावा करण्यात आला. मुळात धामणगावच्या सरपंचांना व सदस्यांना राजकीय पक्षाच्या या केविलवाणी दाव्याची माहितीदेखील नाही. त्यामुळे धामणगावावर नेमकी सत्ता तरी कोणाची, हा प्रश्न निरुत्तरच आहे.
तालुक्यात नुकत्याच ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर ४९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. निकाल लागताच आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनेला केला. या सर्वांची गोळाबेरीज लावली असता तालुक्यात असलेल्या सदस्य संख्येपेक्षा जास्तीचा आकडा होऊ लागला आहे. दरम्यान सरपंचपदाच्या निवडणुका झाल्या. आता या सरपंच पदावरही तिन्ही पक्षांच्यावतीने वेगवेगळे दावे केले जात आहेत. असे असले तरी जनतेला सत्य काय आहे, याची जाणीव तर आहेच. धामणगाव येथील सरपंचपदी सरसाबाई डिडोरे यांची निवड झाली. त्या आमच्याच पक्षाच्या सरपंच आहेत, असा दावा भाजप व शिवसेनेकडून पत्रकाद्वारे केला आहे, तर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तोंडी दावा केला आहे. वास्तविक अनेक गावात पॅनल तयार करताना विविध पक्षाशी निगडित उमेदवार घेतले गेले आहे. गावातील राजकारण वेगळे असते. सरपंचपद देताना काही ठिकाणी अडीच वर्षांची तडजोड करण्यात आली आहे. गावगाड्याच्या राजकारणात बहुतांश ठिकाणी पक्षाचा फारसा विचार केला गेला नाही. अशा परिस्थितीतदेखील राजकीय पक्षांची दावेदारी केविलवाणीच म्हणावी लागेल.
-----
या गावांवर केला विविध पक्षांनी दावा
तालुक्यातील सुलतानवाडी, धामणगाव, सोनारी, दरेगाव दरी, सांजूळ या पाच ग्रामपंचायतमध्ये आमचाच सरपंच असल्याचा दावा शिवसेना व भाजपाच्यावतीने करण्यात आला. दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी पक्षाच्या लेटरहेडवर अशा प्रकरचे परिपत्रक काढून या गावाचा सरपंच आमच्या पक्षाचा असल्याचे जाहीर करून टाकले. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्षात सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत चर्चादेखील केली नाही. केवळ गावगाड्याची संख्या वाढविण्यासाठी असे फंडे वापरले जाऊ लागले आहेत. शिवाय महाल किन्होळा, साताळ पिंप्री, वाणेगाव, वाकोद दरेगाव दरी, कान्हेगाव, अडगाव खुर्द येथील उपसरपंच पदावर ही भाजप व शिवसेनेच्यावतीने दावेदारी ठोकली आहे.