वाळूज महानगर : जमिनीच्या वादातून आजोबाला धक्काबुक्की करुन चुलता-चुलतीस मारहाण केल्याची घटना गुरुवारी जोगेश्वरीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोगेश्वरी येथील रामराव बाजीराव काजळे यांची विटावा शिवारात गट क्रमांक ५३ मध्ये ४ एकर २० गुंठे तर जोगेश्वरीत ५ एकर अशी एकूण ९ एकर २० गुंठे शेतजमीन आहे. रामराव काजळे यांनी विटावातील ३ एकर जमीन मुलगा महादेव याला खाण्यासाठी दिली आहे. जोगेश्वरीतील प्रत्येकी अडीच एकर जमिन डिंगबर काजळे व गणेश काजळे यांना दिलेली आहे.
दरम्यान, महादेव काजळे यांचे पुतणे शंकर व रामेश्वर यांनी भागीदारीत जेसीबी खरेदी केले आहे. या जेसीबीवर कर्ज काढण्यासाठी १६ एप्रिलला शंकर व रामेश्वर हे आजोबा रामराव यांच्याकडे गेले होते. या दोघांनी जेसीबीच्या कागदपत्रावर रामराव यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. यानंतर गुरुवारी शंकर, रामेश्वर व प्रविण हे रामराव यांच्याकडे फोटो आणण्यासाठी गेले होते. यावेळी महादेव यांनी कर्ज प्रकरणासाठी माझ्या ताब्यातील जमिनीचे कागदपत्रे लावू नका, असे सांगितले. यावेळी आजोबा रामराव काजळे यांनी सर्व जमिनीवर कर्ज काढु नका, मी खाते फोड करुन देतो असे सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी रामराव यांना धक्का-बुक्की केली.
महादेव काजळे व त्यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात या तिघांनी चुलता-चुलतीस शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची नासधूस करीत जिवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले. या प्रकरणी महादेव काजळे यांच्या तक्रारीवरुन शंकर काजळे, रामेश्वर काजळे व गणेश काजळे या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.