औरंगाबाद : दुकान फोडून रोख रकमेसह पाण्याची मोटार आणि संगणक, असा ऐवज चोरणाऱ्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह दोन चोरट्यांना शनिवारी सिडको पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून चार दुचाकी, चोरीचा मुद्देमाल, असा एकूण १ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शेख सोहेल शेख इस्माईल (२२, रा. बागवान गल्ली, गरम पाणी) आणि सय्यद ताहील सय्यद नईम (२०, रा. तोफखाना बाजार, छावणी), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून चार दुचाकी, चोरीचा मुद्देमाल, असा एकूण १ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी रविवारी (दि.१०) दिली.
विवेकनगर, एन-२ सिडको येथे राहणारे संजय रामराव पवार (वय ५०) यांचे सेव्हन हिल येथील ज्योतिर्मय कॉम्प्लेक्समध्ये कृष्णा सेल्स काॅर्पाेरेशन नावाचे दुकान आहे. ७ जानेवारीच्या रात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १४ हजारांची रोख रक्कम, २४ हजार रुपये किमतीच्या पाण्याच्या सहा मोटारी आणि तीन हजार रुपये किमतीचे संगणक, असा सुमारे ४१ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सिडको पोलीस ठाण्याच्या पथकाला टीव्ही सेंटर भागात गस्तीवर असताना संजय गांधी मार्केट येथे चोरलेल्या पाण्याच्या मोटारी विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. विशेष पथकाने छापा मारून शेख सोहेल, सय्यद ताहील यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पाण्याच्या मोटारी आणि दुचाकी चोरी केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.