लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने काँग्रेसचे गणेश देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी जाहीर केले.परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती आणि प्रभाग समितींच्या तीन सभापतींची निवड करण्यासाठी ११ जुलै रोजी येथील बी.रघुनाथ सभागृहात पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. स्थायी समिती सभापती पदासह तीनही प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने सर्व सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख यांची निवड जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभाग समिती ‘अ’ च्या सभापती पदासाठी काँग्रेसच्या विद्याताई नारायणराव जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग समिती ‘ब’ साठी काँग्रेसचे रामा गुजर आणि प्रभाग समिती ‘क’ च्या सभापतीपदी महेबूब खान यांची बिनविरोध निवड झाली. या निवड प्रक्रियेच्या वेळी मनपा आयुक्त राहुल रेखावार, उपायुक्त अनिल गिते, नगरसचिव मुकूंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. गणेश देशमुख यांच्यासह इतर तिन्ही सभापतींची बिनविरोध निवड झाल्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, आयुक्त राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर सय्यद समी ऊर्फ माजू लाला, सभागृह नेते भगवानराव वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला. या प्रसंगी नगरसेवक सुनील देशमुख, सचिन देशमुख, वनमाला देशमुख, वैशाली बुधवंत, अनिता सोनकांबळे, एस़एम़ अली पाशा, जान मोहम्मद जानू, मोहम्मद नईम, नागेश सोनपसारे, अमोल पाथरीकर, विकास लंगोटे, सचिन अंबिलवादे, पाशा कुरेशी आदींची उपस्थिती होती़
स्थायीसह तीन सभापती बिनविरोध
By admin | Published: July 11, 2017 11:47 PM