बीड : तालुक्यातील म्हाळस जवळा येथे एकाच भूखंडाचे तीन स्वतंत्र पीटीआर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात मूळ मालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दाद मागितली आहे.म्हाळस जवळा येथे सखाराम मारुती खांडे, तुकाराम मारुती खांडे, ज्ञानोबा मारुती खांडे व शहादेव मारुती खांडे या चार भावांची गट क्र. २३७ मध्ये वडिलोपार्जित जमीन आहे. तेथे विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक शाळेच्या दोन इमारती आहेत. १९९४ मध्ये १४ खोल्यांची इमारत बांधलेली असून २००५ मध्ये ग्रा. पं. च्या परवानगीनेच सिमेंट काँक्रिटसह दुसरी पक्की इमारत बांधण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायतीने ३७८ क्रमांकाचा पीटीआरही दिला होता. जि.प. च्या शिक्षण विभागासह इतर शासकीय कामांसाठी याच पीटीआरची प्रत दिलेली आहे. दरम्यान, खांडे बंधुंनी कामानिमित्त ग्रा. पं. कडे पीटआर मागितला तेव्हा वसुदेव प्रल्हाद खांडे या मयत व्यक्तीच्या नावे ३७८ क्रमांकाच्या भूखंडाची नोंद असल्याचे उघड झाले. आश्चर्याची बाब म्हणजे याच क्रमांकाचा पीटीआर शेषेराव साहेबराव खांडे यांनाही दिल्याचे समोर आले. त्यामुळे हा सर्व प्रकार खोडसाळपणातून झाल्याचा आरोप शहादेव खांडे यांनी केला आहे. पीटीआरच्या मालकी हक्कात खाडाखोड करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मूळ दस्ताऐवजात दुरुस्ती करुन शाळा इमारतीची नोंद असलेल्या भूखंडाचा पीटीआर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
एकाच जागेचे तीन पीटीआर !
By admin | Published: August 26, 2016 12:14 AM