भोकरदन : पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तीन टपर्यांना गुरूवारी रात्री ११ वाजेदरम्यान अचानक आग लागल्याने टपर्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पंचायत समिती परिसरातील गणपती झेरॉक्स या दुकानातील कृषी विद्यापीठ नाशिक यांनी काही झेरॉक्ससाठी ठेवलेल्या प्रकल्पासह इतर ग्राहकांचा मूळ दस्तऐवजसुद्धा जळून खाक झाला. तसेच झेरॉक्स मशीन, संगणक आदी साहित्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानमालक विष्णू शेंद्रे यांनी सांगितले. याच शेजारी शिवाजी जनरल स्टोअर्समधील साहित्यासह फ्रीजही जळून खाक झाले. यात ३ लाख ५० हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभाकर चक्के यांनी सांगितली. त्या शेजारीच असलेल्या एकता जेन्टस् पार्लर या दुकानालाही आग लागल्यामुळे विविध साहित्य जळून खाक झाले. यात ५० हजारांचे नुकसान झाल्याचे शिवाजी वरपे यांनी सांगितले. आगीची घटना कळताच शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या कर्मचार्यांसह परिसरातील नागरिकांनी आग विझविली. विशेष म्हणजे आग लागल्याचे कळाल्यानंतरही पोलिस घटनास्थळी फिरकलेही नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, या प्रकारानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
भोकरदन शहरात तीन टपर्या जळून खाक; ७ लाखांचे नुकसान
By admin | Published: June 01, 2014 12:16 AM