बाळासाहेब जाधव , लातूरगेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ वर्षभरात विविध घटनेत १ हजार ७९ जणांनी मृत्यूला कवठाळल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे़ विषारी द्रव, चिमणीचा भडका, विहिरीत उडी तर कोणी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़ दर २४ तासाला जिल्ह्यात तीन जण आत्महत्या करीत असल्याचे वर्षभराच्या आकडेवारीतून पुढे आले आहे़ आधुनिक युगात मानवाला सुख सुविधा वाढल्या असल्या तरी मानसिक समाधान नसल्याचेच यावरून दिसत आले़ किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ पतीने रागावले, शेतीचे उत्पादन घटले, पालकांनी रागावले, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, कर्जाचे डोंगर, मानसिक स्थिती बिघडली आदी कारणांमुळे मृत्यूला कवटाळण्याचे प्रमाण आता वाढत आहे़ लातूर जिल्ह्याची ओळख शिक्षणाच्या बाबतीत लातूर पॅटर्न म्हणून राज्यभर आहे़ शैक्षणिक वातावरण पोषक असल्याने याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा अधिक आहे़ तसेच कृषी उत्पन्न समितीची ओळख शेती मालाचे रोखीने व्यवहार यातून आहे़ शिवाय सहकारी साखर कारखाना असो की जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारातून उध्दार हा लातूर पॅटर्न राज्यभर नावाजलेला असताना आत्महत्यांचे सत्र वाढत असल्याने घातक ओळख जिल्ह्यापुढे आली आहे़ वर्षभरात विविध कारणांमुळे झालेल्या आत्महत्यांची संख्या ही अचंबीत करणारी आहे़ स्पर्धेच्या युगात धावपळ वाढल्याने लोकांच्या इच्छा, आकांक्षा वाढत चालल्या आहेत़ त्यातूनच काही तरी वेगळे करण्याच्या भानगडीत जाऊन नुकसान झाल्यावर आर्थिक विवंचनेतही काहींनी आत्महत्या केल्या आहेत़ विकासाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या लातूर जिल्ह्याला मागील काही वर्षांपासून जणू ग्रहणच लागले आहे़ त्यातूनच काही आत्महत्या झाल्याचेही उघड झाले आहे़ जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या १२ महिन्यात विविध कारणांमुळे १ हजार ७९ मृत्यूची नोंद झाली आहे़ पोलिस दप्तरी बहुतांश प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद झाली असली तर आत्महत्येचे हे प्रमाण चिंतन करायला लावणारे आहे़ वर्ष २०१३ मध्येही १ हजार ८० मृत्यूच्या घटना घडल्या असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या डायरीत नोंद आहे़
दर २४ तासाला तीन आत्महत्या !
By admin | Published: February 17, 2015 12:17 AM