औरंगाबाद, दि. ९ : घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हेशाखेने २४ तासात बेड्या ठोकल्या. सागर सुभाष बुट्टे(वय २०), उमेश उत्तम डुकळे(वय२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड(वय२६,सर्व रा.जयभवानीनगर)असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहे.
या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती देताना गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की,गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहिता ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वराजनगर येथे राहणा-या चुलतीला भेटून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे घरी जात होती.यावेळी जयभवानीनगर चौकात आरोपी सागर रिक्षाचालक तिला भेटला. तेव्हा त्याच्या रिक्षात आरोपी उमेश आणि अनिल हे बसलेले होते. त्याने रेल्वेस्टेशनला सोडतो,चल असे म्हणून रिक्षात बसविले.
यानंतर त्यांनी पीडितेला रेल्वेस्टेशनला न सोडता ते तिला घेऊन विमानतळ भिंतीलगतच्या रेल्वेगेटकडील एका पडक्या वाड्यात घेऊन गेले. तुम्ही मला इकडे कोठे घेऊन आला,असे विचारताच आरोपींनी तिला चाकूने भोसकून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी प्रथम सागरने आणि नंतर उमेश व अनिल यांनी तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिने आरडाओरड करू नये, म्हणून नराधमांनी तिच्या तोंडाला पट्टी बांधली. अमानुष अत्याचार केल्यानंतरही त्यांनी तिला सोडून दिले नाही. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस डांबून ठेवले. यानंतर घटनेची कोठेही वाच्यता केल्यास, तुला मारून टाकीन अशी धमकी देत त्यांनी तिच्या पायाच्या नळगीवर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. शनिवारी रात्री आरोपीं आरोपी तिकडे न फिरकल्याने पीडितेने स्वत:ची सुटका करून घेतली.यानंतर ती घरी गेली.घडलेली सर्व घटना तिने पतीला सांगितली. रविवारी दुपारी पीडिता पतीसह मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. तेथे तिने नराधमांविरूद्ध फिर्याद नोंदविली.
अशी झाली अटकघटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकाँ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी,सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, नंदलाल गवळी,धर्मराज गायकवाड,लालखॉ पठाण, योगेश गुप्ता, हिरा राजपूत यांनी मोठ्या शिताफीने सागरसह अन्य दोन जणांना बीड बायपास परिसरातून पकडले.