राजेश गंगमवार, बिलोली गोदावरी नदीवरील बाभळी बंधार्याचा ज्वलंत प्रश्न प्रदीर्घ काळानंतर निकाली निघाल्याने यावर्षी नदी परिसरातील तीन तालुके टँकरमुक्त झाले़ तिन्ही तालुक्यातील जवळपास ६० ते ७० गावच्या पाणीपुरवठा योजना गोदापात्रातून असल्याने पाणीटंचाईची समस्या निकाली निघाली आहे़ आॅक्टोबर २०१३ च्या दरम्यान बहुचर्चित बाभळी बंधार्याला गेट बसविण्यात आले़ तत्पूर्वी बाभळी बंधारा कृती समितीचा लढा सुपरिचित आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाभळी बंधार्यावर गेट बंद करण्यात आले़ गेट बंद होताच गोदावरी नदी पात्राची पातळी व जलस्तर हळहळू वाढू लागला व उन्हाळ्यातही गोदावरी नदी पात्रात काठोकाठ पाणी दिसू लागले व पावसाळ्याप्रमाणे गोदावरीत जलसाठा जमा झाला़ बाभळी बंधार्यामुळे पाच तालुक्यातील शेतकर्यांना लाभ मिळत आहे़ जलस्तर वाढल्याने शेती सुजलाम् सुफलाम् होवू लागली़ दरम्यान, गोदावरी नदीपात्रात बिलोली, उमरी, धर्माबाद तालुक्यातील पाणीपुरवठा योजना आहेत़ ग्रामीण भागापाठोपाठ कुंडलवाडी शहराची पाणीपुरवठा योजनाही गोदावरीतच आहे़ धर्माबाद शहराला पाणीपुरवठा गोदावरीतूनच होतो़ तर बिलोली शहरासाठी पाणी पुरवठ्याची योजना प्रस्तावित करण्यात आली़ तालुक्यातील २४ गावांच्या तर धर्माबाद तालुक्यातील १८ व नायगाव तालुक्यातील १० गावांच्या व उमरी तालुक्यातील १० गावांच्या योजना गोदावरी पात्रातच आहेत़ अशा योजनाद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो़ गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने योजनेच्या माध्यमातून मुबलक पाणीपुरवठा होत आहे़ पाणीपुरवठा योजना पाठोपाठ भूगर्भातील जलसाठा व स्तर वाढल्याची माहिती भूजल विभागाकडून मिळाली़ कित्येक गावात बंद पडलेल्या विहिरींना सुद्धा पाणी आल्याच्या घटना समोर आल्या़ नदी परिसरातील ५० ते ६० कि़मी़ अंतरावर असलेल्या गावांत विंधन विहिरींना कमी अंतरावर (फुटावर) पाणी लागत असल्याचे पुढे आले आहे़ बाभळी बंधा्रयाचा परिणाम तातडीने जाणवू लागला आहे़ परिणामी बिलोली, धर्माबाद व उमरी ही गोदागाठची तालुके टँकरमुक्त झाली आहेत व पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे़ बाभळी बंधार्याचा यशस्वी लढ्याची चर्चा पाणीटंचाई संपल्याने आता पुढे आली आहे़ यावर्षी पावसाळ्यातली सरासरी पेक्षा जास्त पाऊस झालेला असला तरी बाभळी बंधार्यामुळे भविष्यातही पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असे जाणकार सांगत आहेत़
तीन तालुके झाले टँकरमुक्त
By admin | Published: May 15, 2014 11:35 PM