औरंगाबाद : शेअरचॅट ॲपच्या मध्यमातून ओळख झालेल्या पुण्या, मुंबईतील गर्लफ्रेंडवर उधळपट्टी करण्यासाठी शहरातून दुचाकींची चोरी करून ग्रामीण भागात विकणाऱ्या त्रिकूटाला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून तब्बल ८ लाख ९० हजार रुपयांच्या ११ दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
नारायण रामराम भंडारे (२१), कृष्णा ज्ञानोबा होळकर (२४), अर्जुन मधुकर वाकळे (२४, रा. रांजणगाव शे.पु. ता. गंगापूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांना शहरातील घाटी, पैठणगेट, एमआयडीसी वाळूज भागातून दुचाकींची चोरी करून काही दुचाकी विकल्या आहेत, तर काही दुचाकी घरी ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ओयासीस चौकात एक आरोपी सापडला. उर्वरित दोघे जण घरी होते. तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. शेअरचॅटच्या माध्यमातून तिघांच्या अनेक गर्लफ्रेंड झाल्या होत्या. या पुणे, मुंबईत असलेल्या गर्लफ्रेंडना भेटण्यासाठी तिघेही जात होते. त्यांच्या शॉपिंगसह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी दुचाकींच्या विक्रीचे पैसे खर्च केले जात असल्याचेही तिघांच्या चौकशीतून समोर आले आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त विशाल ढुमे पाटील, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे, हवालदार दत्तात्रय गडेकर, ज्ञानेश्वर पवार, परभत म्हस्के, संदीप बीडकर, विजय भानुसे, नितीन देशमुख, तात्याराव शिनगारे, अजय चौधरी, संदीप पाटील यांच्या पथकाने केली.
ग्रामीण भागात दुचाकींची विक्रीहँडल लॉक न केलेल्याच दुचाकींची चोरी हे त्रिकूट करीत होते. चोरलेल्या दुचाकींची राजूर, लासूरसह इतर ग्रामीण भागात विक्री केली जात होती. त्यामुळे नागरिकांनी दुचाकींचे हँडल लॉक करावे, असे आवाहन निरीक्षक आघाव यांनी केले आहे.