वाळूज महानगर : आएसओ नामांकन प्राप्त जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे कचºयाचे नियोजन कोलमडल्याने कचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहेत. कचरा डेपो नसल्याने जमा झालेला कचरा गावातच मोकळ्या जागेवर टाकला जात असून, नागरी वसाहतीतच कचºयाचे ढिग साचले आहेत. घाणीमुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा फैलाव होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाळूज महानगरातील श्रीमंत व आयएसओ नामांकन प्राप्त ग्रामपंचायत म्हणून जागेश्वरी ग्रामपंचायत ओळखली जाते. परंतू येथील नागरी समस्या पाहता ग्रामपंचायतीच्या आएसओ नामांकनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पूर्वी ग्रामपंचायतीकडून गावातील संकलित केलेला कचरा गावाबाहेर एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर टाकला जात आहे. दरम्यान, एमआयडीसीने बहुतांश मोकळ्या भूखंडावर वृक्षलागवड करुन कचरा टाकण्यास पायबंद घातला आहे. एमआयडीसीच्या या निर्णयामुळे जोगेश्वरी ग्रामपंचायतीची अडचण झाली आहे. गावातील कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीने घंटागाडीची सोय केली आहे.
परंतू जमा झालेल्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा डेपो नाही की हक्काची जागा नाही. शिवाय कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीनेही विशेष प्रयत्न केले नाहीत. पर्यायी जागा नसल्याने जमा झालेला कचरा गावातील मोकळ्या जागेवर टाकला जात आहे. त्यामुळे नागरी वसाहतीत जागोजागी कचºयाचे ढिग साचले आहेत.
जि.प. शाळेच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेला तर कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. घाणीमुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा फैलाव वाढल्याने नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.