औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. संजीवनी मुळे या केंद्रप्रमुख असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात सुरू असलेल्या बी.एड.च्या परीक्षेत गैरप्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या भरारी पथकाच्या निदर्शनास एकाच बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविल्याचे दिसून आले. यावरून जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या तीन सदस्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक विशेष भरारी पथक नेमले आहे. यातील एका पथकाचे प्रमुख डॉ. शंकर अंभोरे यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला भेट दिली असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. उर्दू विषयाची परीक्षा सुरू असलेल्या एका वर्गात प्रत्येक बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविल्याबद्दल भरारी पथकाने आक्षेप घेतला. डॉ. अंभोरे यांनी वर्गातील पर्यवेक्षक शिक्षिकेला जाब विचारला असता, दोघात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. संबंधित शिक्षिकेने वर्गात ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. आपण सांगत असलेल्या गोष्टीचा जाब प्राचार्यांना विचारावा. आपणाला उत्तर देण्याचे काम माझे नाही, असे म्हणत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यावरून पुन्हा जोरदार खडाजंगी झाली. संबंधितांनी मीसुद्धा उच्चशिक्षण विभागाची माजी सहसंचालक असून, नियम माहिती आहेत, असे सुनावल्याचे समजते.
केंद्रात सुरू असलेल्या गैरप्रकाराची नोंद परीक्षेच्या नोंदवहीत करण्यात आली. या प्रकाराच्या वेळी महाविद्यालयात विद्यापीठाच्या अधिष्ठाता तथा केंद्रप्रमुख डॉ. संजीवनी मुळे यांची उपस्थिती होती. डॉ. मुळे या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या सदस्या आहेत. तसेच परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकींचे सदस्यत्व त्यांनी भूषविलेले आहे. या प्रकारामुळे व्यवस्थापन परिषद सदस्याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या भरारी पथकाने अरेरावी केली का? अधिष्ठातांच्या महाविद्यालयात गैरप्रकार झाला का? अशी चर्चा विद्यापीठात करण्यात येत आहे.
याविषयी अधिष्ठाता डॉ. संजीवनी मुळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर अनेक वेळा संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा म्हणाले, शासकीय अध्यापक महाविद्यालयातील परीक्षेविषयी काही गैरप्रकार झाल्याची अद्यापही विभागाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच केंद्र प्रमुखांनीही कळविलेले नाही, असे सांगितले.
शासकीय अध्यापक महाविद्यालयात गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार महाविद्यालयात पाहणी केली असता, उर्दूची परीक्षा सुरू असलेल्या वर्गात एकाच बेंचवर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसविण्यात आले होते. इतरही काही गैरप्रकार दिसले. हे सर्व प्रकार बंद करीत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसविले. त्याची नोंद नोंदवहीत केली आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठाला सविस्तर अहवाल देण्यात येईल.- डॉ. शंकर अंभोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा भरारी पथकप्रमुख