लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या गोंधळाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा कॅरिआॅन देण्याची मागणी कुलगुरूंकडे केली. यावर निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. अर्ध्या तासाच्या अंतरानेच तब्बल तीन वेळा बैठकीची तारीख आणि वेळ बदलल्याचे संदेश सदस्यांना पाठविण्यात आले आहेत.विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी (दि.११) व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना कुलगुरूंच्या आदेशानुसार अभियांत्रिकीच्या कॅरिआॅन प्रश्नावर आपत्कालीन बैठक बुधवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता आयोजित केल्याचा संदेश पाठविला. यानंतर काही मिनिटातच ही बैठक १४ सप्टेंबर रोजी होणार असल्याचा संदेश पाठविला. यानंतर काही वेळातच पुन्हा आठवणीचा संदेश पाठविला. यास तास दीड तास होताच ही बैठक १५ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे संदेश मिळाल्याचे एका सदस्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या दिवशी गौरी पूजन असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचेही सहा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला कळविले आहे. यावरून विद्यापीठ प्रशासनाचे धरसोड धोरण पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
अर्ध्या तासात तीनदा तारीख बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:50 AM