सिल्लोड : मिरची घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या एका टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे तरुण ठार झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भवन पुलावजवळ घडला. कार्तिक संजू लोणकर (१९), बाळू उर्फ धनंजय अशोक बेलेवार (१९, दोघेही रा. पिंपळगाव पेठ) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
दुचाकीस्वार कार्तिक व धनंजय हे महालक्ष्मीचे जेवण करून पिंपळगाव पेठ येथून कामानिमित्त सिल्लोडकडे जात होते. तर टेम्पो हा सिल्लोडकडून मिरची घेऊन औरंगाबादकडे जात होता. दरम्यान, जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील भवन पुलाजवळ रस्ता खोदून ठेवलेला आहे. त्या ठिकाणी मोठी चर पडली असून चरीतून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. याचदरम्यान भवन पुलाजवळ वेगात आलेल्या टेम्पोने कार्तिक व धनंजयच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते दोघेही जागीच ठार झाले. तर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. दोघांचे मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सिल्लोड शहर पोलिसांनी पंचनामा केला आहे, तर फरार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध केला जात आहे.
दुचाकी चक्काचूरटेम्पोने दुचाकीला दिलेली धडक एवढी भयंकर होती की, सदरील दुचाकी चक्काचूर झाली आहे. या अपघातानंतर टेम्पोचालक वाहनासह फरार झाला आहे. मयतातील एक तरुण सिल्लोड येथील कापड दुकानावर कामाला आहे, तर एक जण गावात सलूनचा व्यवसाय करतो. सदर अपघाताची नोंद सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
दोन दिवसांत तीन जणांचा बळीसदर अपघात जळगाव-औरंगाबाद महामार्गावर खोदलेल्या चरीमुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या महामार्गावर रविवारी सायंकाळी चिंचखेड्या गावाजवळ एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर चोवीस तासांत पुन्हा दोन बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन दिवसांत तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.