वैजापुर : कोरोनाबाधित रुग्णांवर विनापरवाना उपचार करणाऱ्या लाडगाव रोडवरील आधार रुग्णालयाची तपासणी होऊन तीन दिवस उलटले. तरी देखील प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अन्य घटनांप्रमाणेच अहवालाचे सोंग घेऊन कारवाई न करण्याची ही चाल असू शकते, अशी चर्चा वैजापुरात सुरू झाली आहे. कारवाईला विलंब होत असल्याने अशा खासगी रुग्णालयाची मात्र मुजोरी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
आधार हाॅस्पिटलमध्ये शासनाची कोणतीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. गेल्या आठवड्यात एकाच दिवशी दोन बाधितांचा उपचारादरम्यान या रुग्णालयात मृत्यू झाला होता. शासकीय यंत्रणेला झोपेत ठेवून दोन्ही मृतदेह नातेवाईकांकडे परस्पर देऊन अंत्यसंस्कार उरकण्यात आले होते. या गंभीर घटनेचे वृत्त प्रकाशित होताच, निद्रावस्थेत असलेले तहसील व आरोग्य प्रशासन जागे झाले. त्यानंतर तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पथकाने या दवाखान्याची तपासणी केली. तपासणीनंतर या दवाखान्याला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला. मात्र, अद्यापही या रुग्णालयाकडून कोणताही खुलासा न मिळाला नाही. खुलासा देण्यासाठीदेखील आधार रुग्णालयाचे प्रशासन समोर आले नाही. तरीही शासकीय यंत्रणेकडूून अद्यापही कारवाई केली गेली नाही. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाब असल्याची चर्चा वैजापुरात सुरू झाली. दरम्यान, गुन्हा करूनही प्रशासन काहीही करीत नसल्याने अशा मुजोर रुग्णालय प्रशासनाचे चांगलेच फावले आहे. कोरोना रुग्णांवर बेकायदा उपचार करून संक्रमण वाढविणे, महामारीच्या काळात रुग्णांची लूट करणे, मयत रुग्णांची माहिती पोलीस स्टेशनला न कळविणे, असे गंभीर गुन्हे होऊनही संबंधित दवाखान्यावर कारवाई करण्यात विलंब होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
कोट
आधार हॉस्पिटलची पथकाने तपासणी केली आहे. संबंधिताला नोटीस बजावण्यात आली असून खुलासा मागविण्यात आला आहे. अद्याप संबंधितांकडून खुलासा मिळाला नाही. खुलासा मिळाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. - तहसीलदार राहुल गायकवाड.
चौकट
तालुक्यातील महालगाव येथील एशियन खासगी पॅथाॅलाजी प्रयोगशाळेत अनधिकृतपणे सापडलेल्या रॅपिड ॲंटेजेन चाचणी किटप्रकरणी लॅब चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील शहा (रा.देवगाव रंगारी ता.कन्नड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. महालगाव येथील एशीयन लॅबमध्ये बेकायदा कोरोना तपासणी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांच्या आदेशानुसार गाढेपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी राजहंस माटे यांनी शुक्रवारी नियमाचे उल्लघंन केल्याप्रकरणी कलम १८८ प्रमाणे खासगी पॅथालाॅजी लॅबचे चालक शकील शहा यांच्याविरोधात विरगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, फौजदार नवनाथ कदम करीत आहेत.