छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी पूर्वी दोन जुन्या जीर्ण जलवाहिन्या होत्या. आता तिसरी नवीन जलवाहनीही सुरू झाली. त्यानंतरही यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कायम राहणार आहेत. शहरवासीयांना उन्हाळ्यात मनपाकडून कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
शहरासाठी जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत ७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही जलवाहिन्यांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे २५०० मिमी व्यासाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. ७०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात आली. त्यामुळे आता शहरासाठी ७००, ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या अशा तीन योजनांमधून शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. ९०० मिमी व्यासाच्या योजनेमुळे २० एमएलडी पाणी वाढले असा मनपाचा दावा आहे. प्रत्यक्षात एवढे पाणी वाढलेलेच नाही. पाणी वाढले असते तर शहरात किंचित प्रमाणात तरी त्याचा प्रभाव दिसून आला असता. शहरात कुठेच याचा प्रभाव दिसून येत नाही. प्रत्येक वसाहतीला कमी दाबाने आणि एक ते दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होतोय.
पाणी वाढले असा मनपाचा दावा असला तरी जिन्सी, दिल्लीगेट, शहागंज, मरीमाता या ठिकाणच्या जलकुंभांमधून शहराच्या ज्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या त्या भागात सातव्या ते दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पाचव्या दिवशी करण्यात पालिकेच्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. उन्हाळा संपेपर्यंत तरी त्यात यश येणार नाही असे मानले जात आहे. त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला आहे.