औरंगाबाद : रिक्षांत सहप्रवाशांच्या पिशव्यांतून दागिने आणि रोकड लांबविणार्या तीन महिलांना जवाहरनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे लगेच पकडण्यात आले. या महिलांकडून १ लाख १६ हजार ५००रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
स्नेहा अप्पाराव मसनजोगी (२२), पूजा अप्पाराव मसनजोगी(२२) आणि अर्चना अरूण मसनजोगी (३३,रा. श्रीरामपुर, जि.अहमदनगर) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, देवानगरी येथील विनय सोसायटीत राहणार्या जयश्री नारायण शिंदे या गृहिणी गुरूवारी (दि. ८ ) सायंकाळी बाहेरगावाहून महावीर चौकात (बाबा पंप चौक) उतरल्या. तेथून त्या घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसल्या. यावेळी आरोपी तीन महिलांही त्यांच्याशेजारी सहप्रवाशी म्हणून बसल्या. यावेळी आरोपी महिलांसोबत त्यांची चिमुकले मुलेही होते. यावेळी त्यांनी रिक्षात गर्दी करून जयश्री यांची नजर चुकवून त्यांच्या बॅगची चेन उघडली आणि त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख असा सुमारे १ लाख १६ हजार ५००रुपयांचा ऐवज हातोहात काढून घेतले. दर्गाचौकाच्या अलीकडे जयश्री रिक्षातून उतरल्या आणि पायी घरी चालत गेल्या. त्यानंतर पुढे चौकात आरोपी महिलां रिक्षातून उतरल्या.
घरी गेलेल्या जयश्री यांना त्यांच्या बॅगेची चेन उघडी दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी बॅॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याघटनेची माहिती त्यांनी लगेच जवाहरनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांना फोन करून दिली. लोकमततर्फे शहानुरमिया दर्गा चौकात आयोजित सखी गौरव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून असलेल्या पो.नि.आघाव यांनी लगेच अन्य सहकार्यांना या घटनेची माहिती दिली आणि रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. चौकात गेल्यानंतर पोलीस रिक्षाचालकांशी बोलत असताना एक रिक्षाचालक त्यांच्याकडे आला आणि त्याच्या रिक्षातून तीन महिला उतरून या दिशेने गेल्याचे सांगितले. तेवढ्यात तक्रारदार जयश्री यांनीही याच रिक्षातून आपण प्रवास केल्याचे सांगितले.
यावेळी रिक्षाचालकाच्या मदतीने पोलिसांनी त्या महिलांचा शोध घेतला असता त्या तिघीजणी पायी जात असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी त्यांना लगेच रिक्षात बसून ठाण्यात नेले. तेथे महिला पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांनी साडीच्या आतून असलेल्या पेटीकोटच्या खिशात दागिने लपवून ठेवल्याचे दिसले. जयश्री यांचे चोरीला गेलेले सर्व दागिने अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी वसूल केले. यात रिक्षाचालकाची मदत झाल्याचे निरीक्षक आघाव यांनी सांगितले. आरोपी महिलांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.