वाळूज महानगर: वाळूज ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळूजवाडी येथील नागरिकांना नागरी सुविधा मिळविण्यासाठी गत तीन-चार दशकापासून संघर्ष करावा लागत आहेत.
वाळूजवाडी या वार्ड क्रमांक ६ मध्ये येणाऱ्या वसाहतीत विविध नागरी सुविधाचा अभाव आहे. या वसाहतीत जवळपास ४०० नागरिक वास्तव्यास असून पिण्याचे पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा करुन शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात नाही. या भागातील विहिरी व बोअरचे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे नागरिकांना वापर करता येत नाही. या वसाहतीत केवळ एक हातपंप असून, या पंपावर पाणी भरण्यासाठी गर्दी असते. या हातपंपाची दुरुस्ती व देखभाल केली जात नसल्याने पाणी हापसताना दमछाक होते. पाणी प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे विकतचे जारचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. वसाहतीकडे जाणाºया मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
पावसाळ्यात कच्या रस्त्यावरुन ये-जा करतांना नागरिकांना कसरत करावी लागत. गंभीर आजारी रुग्णांना पावसाळ्यात रुग्णालयात नेण्यासाठी नागरिकांचे हाल होतात.येथील जिल्हा परिषद शाळेचीही अत्यंत दुरावस्था झाली असून, पावसाळ्यात वर्गखोली गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना व्हरंड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागते. या वसाहतीतील ड्रेनेजलाईनसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केल्यामुळे ग्रामपंचायतीने ड्रेनेजलाईनचे काम हाती घेतले आहे. आजघडीला या ड्रेनेजलाईनचे काम पूर्णत्वाकडे असल्यामुळे ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला आहे. या विषयी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तो संपर्क होऊ शकला नाही.