सोयगाव : पर्यटनासाठी जळगाव जिल्ह्यातून आलेली तीन तरुण पाण्यात धारकुंड येथील तलावात बुडल्याची धक्कादायक घटना (बनोटी, ता. सोयगाव रविवारी (दि.०९) सायंकाळी घडली. रात्रीची वेळ आणि पाऊस चालू असल्याने शोध कार्यात अडथडा येत आहे. रात्री उशिरापर्यंत एकाचाही शोध लागला नव्हता. यामुळे सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राकेश रमेश भालेराव ( २५, गोदावरी काॅलनी ) राहुल चौधरी (२३, हनुमान नगर ), गणेश भिकन सोनवणे ( २३, राधानगरी जारगांव जि. जळगाव) असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. बनोटी गावापासुन सात किलोमीटर अतंरावर धारकुड हे धार्मीक स्थळ आहे ह्या ठिकाणी तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटक, भाविकांचे आकर्षण ठरत आहे. बाजुला खडकामध्ये महादेवाची पिंड आहे. येथील धोधो कोसळणार्या धारेखाली अंघोळ करण्याचा मोह आवरता येत नसल्याने येथे नेहमी दुर्दैवी घटना घडतात. श्रावण महीन्यात नेहमी भाविकांची याठिकाणी गर्दी होत असते. जळगाव जिल्हातील नऊ मित्र रविवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास दुचाकीने या ठिकाणी आले होते.तेथील मनमोहक धबधबा आणि नैसर्गिक सौंदर्याचा सर्व जण मनसोक्त आनंद घेत होते.
तब्बल दोन तास झाल्यानंतर घराकडे निघण्याच्या तयारीत असतांना तीन जण गायब असल्याचे लक्षात आले. जमलेले पर्यटक आणि सहा मित्रांनी शोधाशोध करुनही मिळाले नाहीत, यातच अंधार पडत असल्याने विष्णू बारी, समाधान बारी, राजेश चौधरी, काकासाहेब लोंढे, अजिंक्य सोळके आणि निलेश अहीरे या मित्रांनी बनोटी दुरक्षेत्र गाठून घटनेची माहिती दिली. यानंतर ठाणे अंमलदार सुभाष पवार, सतीश पाटील, दिपक पाटील, विकास दुबीले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, काळोख आणि पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे. यामुळे सोमवारी सकाळी परत शोध कार्य सुरू करण्यात येणार आहे.