औरंगाबाद : एटीएममध्ये कार्डऐवजी काहीतरी वस्तू टाकून पैसे काढणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला एसबीआय बँकेच्या आयटी सेलच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पाठलाग करून पकडले. परंतु, दोन आरोपी कार सोडून पळून गेले. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ( Police chased and caught a gang of UP money launderers by tampering with ATMs)
रोहितसिंग विजय बहादुरसिंग (वय २९, रा. चारपुरा, ता. लालगंज, जि. प्रतापगड), संजयकुमार शंकरलाल पाल (२१, रा. मनोहरपूर, ता. सौरव, जि. प्रयागराज), अंकुश बढेलाल मोर्या (२१, रा. हरवीपूर, सांजा, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार अलोकपाल आणि भैया हे दोन आरोपी मात्र पळून गेले. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील काही एटीएम सेंटरमधून अनधिकृत व्यवहार होत असल्याची माहिती एटीएम संचलन करणाऱ्या कंपनीच्या आयटी सेलला समजली होती. यामुळे आयटी सेल शहरातील एटीएमच्या व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवून होते. मंगळवारी रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये असा व्यवहार होत असल्याचे समजताच मुंबईतील आय टी सेलने एसबीआय बँकेचे एटीएम संचलन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कळविले. हा प्रकार अधिकाऱ्यांनी मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांना आणि कंपनीचे कर्मचारी आशिष खंडागळे आणि आशिष चव्हाण यांना सांगितला. त्याच परिसरात असलेल्या खंडागळे, चव्हाण यांनी तेथे धाव घेताच आरोपींनी त्यांच्या कारमधून धूत हॉस्पिटलसमोरून ब्रीजवाडीच्या दिशेने पळ काढला.
पोलीस निरीक्षक इंगळे यांनी साथीदारांसह त्यांचा पाठलाग सुरू केला तेव्हा, आरोपींनी कार थांबविली आणि ते पळू लागले. पळणाऱ्या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांचे दोन साथीदार अंधारात पळून गेले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएमची पाहणी केली असता एटीएमच्या कॅशचे शटर चकटलेले दिसले. आरोपींनी २० हजार रुपये काढण्याची कमांड एटीएमला दिली होती. यापैकी १३ हजार रुपये त्यांनी घेतले. उर्वरित सात हजार रुपये मशीनमध्ये अडकल्याचे दिसून आले. याप्रकरणी अभिजित सतीश निकुंभ यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपींनी शहरातील दहा ते बारा एटीएममधून पैसे काढल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय त्यांनी अन्य शहरात आणि राज्यातही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.