औरंगाबाद : शहरातील संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील देवानगरी परिसरातील पीडब्ल्यूडी कॉलनीतून एका बांधकाम व्यावसायिकाचे गोळीबार करून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११. २० वाजेच्या दरम्यान घडली. काही अंतर गेल्यानंतर कार बंद पडल्याने अपहरणकर्ते बांधकाम व्यावसायिकांला मध्येच सोडून पळाल्याने पुढील अनर्थ टळला. अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाजीम पठाण राउफ पठाण असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकाम व्यावसायिक नाजीम पठाण राउफ पठाण यांचे संग्रामनगर उड्डाणपुलाच्या शेजारील देवानगरी परिसरातील पीडब्ल्यूडी कॉलनीत एका साईटचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी ते बांधकाम साईटवर कामाची पाहणी करत होते. दरम्यान, सकाळी ११. १५ वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या कार मधून ३ त ४ जण तेथे आले. त्यांनी नाजीम पठाण यांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यांनी विरोध केला असता एकाने जवळील रिव्हाल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर नाजीम पठाण यांना गाडीत टाकून ते निघाले. पुढे काही अंतर गेल्यानंतर देवळाई ते भालगांव दरम्यान त्यांची कार बंद पडली. यामुळे अपहरणकर्ते नाजीम पठाण यांना तेथेच सोडून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांचचे अनिल गायकवाड, सुरेश वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे.