औरंगाबाद : कौटुंबिक वादातून सासरच्या पाच व्यक्तीनी विषारी औषध पाजले. विषारी औषध पाजण्यात आलेली महिला थेट पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाली. परिसरात बेशुद्ध होऊन पडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या जबाबावरून सासरच्या पाच जणांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हर्सूल परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने घरगुती वादातून महिला सहायक कक्षात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. विवाहितेच्या सासरकडील व्यक्ती सुनावणीला आल्यानंतर हे प्रकरण आपसात मिटवू, असे सांगितल्यामुळे विवाहिता निघून गेली. वाद मिटविण्यासाठी जमल्यानंतर नवरा, दीर आणि सासूने विषारी औषध पाजल्याची तक्रार विवाहितेने केली आहे. विष पाजल्यानंतर विवाहिता पोलीस आयुक्त कार्यालयात आली. तेथे ती बेशुद्ध झाली.
हेही वाचा - हव्यातशा सेल्फिचा मोह नडला; तरुण अजिंठा लेणीतील सप्तकुंडात कोसळला
उपस्थितांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. बेगमपुरा पोलिसांनी महिलेचा जबाब घेतला. त्यावरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अहमद शेख करीत आहेत.