औरंगाबाद: किरकोळ कारणावरून नारेगाव येथे तरूणाचा गळा चिरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी अडिच वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरूणाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे समोर आले.
शेख अरबाज शेख अब्दुल्ला (वय १९,रा. नारेगाव)असे जखमी तरूणाचे नाव आहे. शाम शंकर गंगातीर (रा. नारेगाव)असे हल्लेखोराचे नाव आहे. याविषयी जखमी अरबाजच्या नातेवाईकांनी सांगितले की, शेख अरबाज हा मजूर काम करतो तर त्याचे वडिल बांधकाम मिस्तरी आहे. परिसरात एक अवैध दारू दुकान आहे. या दुकानावर दारू पिणारे लोक अरबाजच्या गल्लीतून ये-जा करतात. हे मद्यपी गल्लीतील महिला आणि मुलींकडे वाईट हेतूने पाहतात. यामुळे अरबाज आणि त्याचे मित्र हे मद्यपींना गल्लीतून ये-जा करण्यास मज्जाव करतो.
तीन दिवसापूर्वी परिसरातील शाम दारू विक्रेता गंगातीरसह काही लोकांना सोबत घेऊन अरबाजच्या घरी आला होता. त्यावेळी दुकानदाराच्या सांगण्यावरून शामने अरबाजला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शिवीगाळ करणाऱ्याच्या भावाने अरबाजच्या घरी येऊन माफी मागितल्याने प्रकरण मिटले होते.
दरम्यान, आज दुपारी सव्वादोन ते अडिच वाजेच्या सुमारास आरोपी शाम याच्या सलूनच्या दुकानाजवळून जात होता. शामला तो नजरेस पडताच, शामने अरबाजला शिवीगाळ करीत त्याच्यावर गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या घटनेत अरबाज गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडताच प्रत्यक्षदर्शी मदतीला धावले आणि त्यांनी लगेच अरबाजला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.