औरंगाबाद : होळीच्या सणानिमित्त नांदेडमध्ये शीख समुदायाच्या वतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल मिरवणुकी दरम्यान काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात मनमोहनसिंग उर्फ सन्नीसिंग सेवादार आणि राणासिंग टाक या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एम.जी. शेवलीकर यांनी मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी लागू केली होती. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा परिसरात होळी सणानिमित्त २९ मार्च २०२१ रोजी हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. मिरवणूक काढण्यासाठी काही तरुणांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले. तसेच पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. त्यात पोलीस अधीक्षकाच्या अंगरक्षकासह एकूण ६ पोलीस जखमी झाले होते.
याबाबत ६१ जणांसह ३०० ते ४०० च्या जमावाविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यातील आरोपी मनमोहनसिंग उर्फ सन्नीसिंग सेवादार आणि राणासिंग टाक या दोघांनी नियमित जामिनासाठी नांदेडच्या सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यांनी मग औरंगाबाद खंडपीठात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या दोघांची प्रथम माहिती अहवालात (एफआयआरमध्ये) नावे नव्हती. मात्र, दोषारोपपत्रात नावे टाकण्यात आल्याची बाजू मांडण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, ॲड. गोविंदराव कुलकर्णी, ॲड. देवांग देशमुख आणि ॲड. विशाल चव्हाण यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.