सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली.
जरंडी गावात पहाटेपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा संचार होता. सकाळी अंगणात उभा राहून ब्रश करणाऱ्या बालकांकडे या कुत्र्यांनी मोर्चा वळवत त्यांच्यावर हल्ला केला. आठ बालकांचे लचके तोडत त्यांना गंभीर जखमी केले. याच दरम्यान, गोठानपुरा येथेही एका बालकाला कुत्र्यांच्या कळपांनी चारही बाजूंनी घेरले होते. हल्ला चढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुत्र्यांच्या कळपांवर ग्रामस्थ वेळीच तुटून पडले आणि बालकाची सुखरूप सुटका झाली. दरम्यान, जखमी बालकांना तातडीने पाचोरा व जळगाव येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यासोबतच यादव नामदेव पाटील ( ५२) या शेतकऱ्यावरसुद्धा कुत्र्यांनी हल्ला चढवला. त्यांच्या पायाची रक्तवाहिन्या कुत्र्यांनी तोडल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने जळगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पिसाळलेली कुत्री जळगावातून आले जळगाव जिल्ह्यातून वाहनाद्वारे कुत्र्यांच्या कळपांना जरंडीला आणून सोडले आहे. यामुळे आठवडाभरापासून गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी थैमान घातले आहे. आज सकाळपासून गावात शुकशुकाट पसरला होता.
सोयगावातही मोकाट कुत्रे सोयगाव शहरातही मोकाट कुत्र्यांची संख्या आहे. बसस्थानक परिसरात या कुत्र्यांनी बस्तान बसविले आहे. मुख्य रस्त्यावर या कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
रेबीजच्या लसीचा तुटवडामोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मात्र रेबीज लस उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना उपचारासाठी पाचोरा, जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.