विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यात १ हजार ८०१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या सर्व दुकानदारांनी कोरोना संसर्ग होण्याच्या भितीने ई-पॉसवर अंगठा ठेऊन धान्य वितरण बंद करण्यासह इतर मागण्यांसाठी १ मे पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संपावर तोडगा निघाला नाहीतर लॉकडाऊन काळात मोफत धान्य वाटपात अडचणी येण्याची शक्यता आहे.
प्रत्येक दुकानदाराच्या संपर्कात ३०० हून अधिक नागरिक येतात. त्यांचे अंगठे ई-पॉस मशीनवर लावून घेतल्यानंतर धान्य दिले जाते. प्रत्येकवेळी सॅनिटायझर वापरावे लागते. यात थोडी गडबड झाली तर दुकानदाराच्या जीवावर बेतू लागले आहे. गर्दी झाल्यानंतर ती आटोक्यात आणणे दुकानातील दोन व्यक्तींच्या आवाक्याबाहेर जाते. यासारख्या अनेक अडचणींचा सामना वर्षभरात रेशन दुकानदारांनी केल्यामुळे ई-पॉसला बंद करण्याची मूळ मागणी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने लावून धरली आहे.
७ लाख ३२ हजार ४४४ कार्डधारकांची संख्या आहे. यातील प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजना तसेच अंत्योदय योजनेतील शेतकरी असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारक आहेत. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबातील शेतकरी खात्याची संख्या ७८ हजार २८०, अंत्योदय अन्न योजनेतील ६५ हजार ४८२ तर प्राधान्य कुटुंबातील ४ लाख ८ हजार ४० असे एकूण ५ लाख ५१ हजार ८०२ कार्डधारकांची संख्या आहे.
रेशन दुकाने आणि कार्डधारकांची संख्या
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकाने - १ हजार ८०१
एकूण रेशनकार्डधारक - ७ लाख ३२ हजार ४४४
पिवळे रेशनकार्डधारक - ६५ हजार ४८२
केशरी रेशनकार्डधारक - ४ लाख ८ हजार ४०
पांढरे रेशनकार्डधारक - ३ लाख २४ हजार ४०४
रेशन दुकानदारांचे सॅनिटायझर असते
शासनाकडून किंवा जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना सॅनिटायझर पुरविले जात नाही. रेशन दुकानदारच स्वत:च्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने वर्षभरापासून सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करीत आहेत. वारंवार मागण्या करूनही प्रशासन आणि शासनाने काहीही दखल घेतली नसल्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये संताप आहे.
१०७ जण दगावले राज्यभरात
अ.म.स्वस्त धान्य दुकानदार महासंघ अध्यक्ष डी.एन.पाटील यांनी सांगितले, मागील वर्षापासून आजवर १०७ रेशन दुकानदारांचे मृत्यू कोरोनाने झाले आहेत. त्यांच्याप्रती एका शब्दाने सहानुभूती शासनाकडून मिळाली नाही. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये ५ जण दगावले. त्यामुळे ई-पॉस बंद करून ते आधारशी लिंक करून धान्यवाटप करण्याची परवानगीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पुरवठा विभाग प्रशासनाने दुकानदारांना धमक्या देण्यास सुरूवात केली आहे. परंतु आमच्या मागण्या मंजुरीबाबत शासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.
मे आणि जून महिन्याचे धान्य देणार
जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांनी सांगितले, मे आणि जून महिन्याचे धान्य देण्यात येणार आहे. मे साठी कोटा मंजूर झाला असून, त्याचे वाटप सुरू केले आहे. तर जूनसाठी प्रत्येकी पाच किलाे मोफत तांदूळ केंद्र शासनाकडून मंजूर होणार आहे. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांना धान्य देण्यात येणार आहे. संपाबाबत रेशन दुकानदार संघटनेशी बोलणी सुरू आहे.