उस्मानाबाद : दिवसभराच्या कडक उन्हानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कसबे तडवळे, गंभीरवाडी परिसरात साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे गारा बरसल्या. पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाल असला तरी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला आहे. विजा पडून तीन जनावरे दगावली आहेत.मागील आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. शनिवारी दिवसभर यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती. साधारपणे दुपारी चार वाजेनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वातावरणातील उकाडा आणखीच वाढला. साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान पावसाळ्याप्रमाणे काळेकु ट्ट ढग जमा झाले. आणि काही क्षणातच जिल्ह्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. कळंब तालुक्यातील ईटकूर, हावरगाव, आंदोरा, पाथर्डी आदी गावात सव्वापाच वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पावसासोबत वादळी वारेही सुरू होते. साधारणपणे पावणेसहा वाजेच्या सुमारास आंदोरा परिसरात पावसाचा जोर वाढला. गावातील रस्त्यांवरून पावसाळ्याप्रमाणे पाणी वाहिले. तसेच साडेसहा वाजेच्या सुमारास गंभीरवाडी शिवारातही जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसासोबतच मोठ्या प्रमाणात गारा बरसल्या. या पावसामुळे शेतातून पाणी बाहेर पडले. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे शिवारातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पावसासोबतच सुपारीच्या आकाराच्या गाराही बरसल्या. पावसादरम्यान वीज पडून शेतकरी भागवत होगले यांचा घोडा आणि शेळीचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी आंब्यासह अन्य फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
गारांचा पाऊस !
By admin | Published: April 29, 2017 11:36 PM