हिंगोली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीनंतर सभापती पदांच्या निवडींची प्रक्रिया घेण्यासाठी ४ आॅक्टोबर रोजी विशेष सभा बोलावण्यात येणार आहे. शिवसेनेतील गटतट एकत्र आल्याने मागील वेळी पदाधिकारी निवडीत धोका झाला नाही. आता माजी खा. सुभाष वानखेडे यांचा गट काय भूमिका घेतो? याकडे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खा. सुभाष वानखेडे यांनी पक्ष बदलला असून ते आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचे समर्थक असलेले जि.प. सदस्य गुरूवारी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडीमध्ये दुसऱ्या गटाला साथ देतात की तटस्थ राहतात? की सेनेच्या आवाजात आवाज मिसळतील, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सेनेसमोर ही बाब पेच म्हणून पुढे येण्याची दाट शक्यता आहे. मात्र दोन दिवसांपासून विधानसभेच्या राजकीय घडामोडीच एवढ्या घडल्या की, यावर चर्चेलाच कोणालाही वेळ मिळाला नाही. पक्ष पातळीवरही उमेदवारांच्या शोधाशोधीत बराच वेळ गेला. त्यामुळे पक्षानेही अद्याप यावर फारसा विचार केलेला दिसत नाही. लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील, हेही तेवढेच खरे. (जिल्हा प्रतिनिधी)
जि.प.सभापती निवडीसाठी गुरूवारी विशेष सभा
By admin | Published: September 28, 2014 11:29 PM