लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्वयंघोषित मन्याडचा वाघ जर सेनेतच असल्याचे सांगत आहे़ तर त्यांनी माझ्या स्वागतासाठी यायला पाहिजे होते़ कारण वाघ हा रंग बदलत नाही़ सरडा मात्र रंग बदलतो, अशा शब्दात आ़ प्रताप पाटील चिखलीकरांवर टीकास्त्र सोडत भाजपामध्ये मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप अॅड़ मुक्तेश्वर धोंडगे यांनी केला़अॅड़मुक्तेश्वर धोंडगे यांनी भाजपाला जय श्रीराम करीत, मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले होते़ त्यानंतर शनिवारी सकाळी देवगिरीने ते नांदेडात दाखल झाल्यानंतर दुचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले़ त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत अॅड़धोंडगे म्हणाले, दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्या भेटीनंतर मी राजकारणात आलो़ विधानसभेला तयारीसाठी केवळ १३ दिवस मिळाले़ भाजपाची सत्ता आल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले़मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपाची भूमिका दुटप्पी आहे़ स्वतंत्र विदर्भाच्या भाजपच्या मुद्यालाही माझा विरोध आहे़ कारण भाई केशवराव धोंडगे यांनीही संयुक्त महाराष्ट्राचा मुद्दा लाऊन धरला होता़ त्यांनी १५ आॅगस्टला सत्याग्रहाची घोषणा केली होती़, परंतु आंदोलनापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले़ आमच्याच पक्षात अशाप्रकारची वागणूक मिळत असेल तर काय अर्थ आहे़ त्यामुळे कोणतीही अट न ठेवता मी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला़ गणेशोत्सवानंतर कंधार येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़ चिखलीकर यांना मातोश्रीवरुन निमंत्रण आल्याचे काही जण सांगत आहेत, परंतु मातोश्रीवरुन आजपर्यंत असे कुणाला निमंत्रण गेले असेल मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी चिखलीकरांना लगावला़ यावेळी आ़ हेमंत पाटील यांनी आगामी मनपा निवडणुकीत सेना युतीसाठी तयार आहे़, परंतु भाजपाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले़ यावेळी धोंडू पाटील, प्रकाश कौडगे, भुजंग पाटील, प्रकाश मारावार यांची उपस्थिती होती़
वाघ रंग बदलत नाही-धोंडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:19 AM