औरंगाबाद : शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खराब रस्त्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादला मान खाली घालावी लागते. शहरातील रस्ते गुळगुळीत व्हावेत यासाठी पाच महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाने स्वत:च्या मालकीचा डांबर प्लांट उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळेल, अशी अपेक्षा ‘आम आदमी’ला होती. मात्र, हा प्लांट उभारण्यात येऊ नये म्हणून शहरातील डांबर लॉबीने कंबर कसली. महानगरपालिका अधिकाऱ्यांनीही या लॉबीसमोर लोटांगण घालत डांबर प्लांटच्या प्रक्रियेत खोडा घातला आहे.अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये मनपाने डांबर प्लांट उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. यासाठी अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते. काही कंत्राटदारांनी मनपाला मोफत यंत्रणा देण्याचेही मान्य केले होते. डिसेंबर महिन्यात डांबर प्लांटच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. नंतर तत्कालीन आयुक्तांची बदली होताच मनपा अधिकाऱ्यांनी सोयीनुसार यू-टर्न घेण्यास सुरुवात केली. पूर्वी अधिकारी डांबर प्लांट सहज उभारण्यात येईल, अशी भाषा करीत होते. आता हा प्रकल्प अशक्य आहे. पुढच्या वर्षी प्लांट टाकण्यात येईल. निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी एक ना अनेक कारणे सांगण्यात येत आहेत. मनपा अधिकाऱ्यांची डांबर प्लांटमधील इच्छाशक्ती नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.महापालिकेत लहान मोठे मिळून १३ ते १५ डांबर, सिमेंट रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार आहेत. यामध्ये लहान कामे करणाऱ्या कंत्राटदारांची संख्या बरीच आहे. महापालिकेने स्वत:चा डांबर प्लांट सुरू केल्यास छोटे कंत्राटदार उपाशी मरतील, अशी भीती अधिकाऱ्यांकडूनच व्यक्त करण्यात येत आहे. छोटे कंत्राटदार दरवर्षी १० ते १२ कोटी रुपयांची कामे करतात. मोठे कंत्राटदार सुमारे २० कोटींपर्यंत कामे करतात. यामध्ये व्हाईट टॅपिंगची कामे करणारेही कंत्राटदार बरेच आहेत.
लॉबीसमोर मनपा झुकली
By admin | Published: May 23, 2016 1:21 AM