औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०१५ ला होणार असून, वॉर्ड रचनेच्या कामाची लगबग पालिका दप्तरी सुरू झाली आहे. प्रभागाऐवजी वॉर्डनिहाय त्या निवडणुका होणार आहेत. नवीन वॉर्ड रचनेच्या कामासाठी सोेमवारपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी २० कर्मचाऱ्यांची मागणी संबंधित विभागाने प्रशासनाकडे केली आहे. प्रभागाचा आराखडा रद्द झाल्यामुळे आॅनलाईन वॉर्ड रचनेच्या आराखड्याचा अहवाल सादर करण्याप्रकरणीही विचार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले, निवडणूक आयोगाला वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाली आहे. सोमवारपर्यंत आयोगाचे नवीन आदेश पालिकेला प्राप्त होतील. निवडणुका वॉर्डनिहाय होणार असून, ११३ वॉर्डांसाठी संभाव्य सामाजिक आरक्षणाचा आराखडा पालिका निवडणूक विभागाने तयार केला आहे. ५७ वॉर्ड महिलांसाठी तर ५६ वॉर्ड पुरुष उमेदवारांसाठी असतील, असा अंदाज आहे. एप्रिलमध्ये निवडणुका...२९ एप्रिल ही महापौर निवडणुकीची तारीख आहे. त्यामुळे निवडणुका या ठरलेल्या कालावधीत होतील. १२ एप्रिल २०१० मध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. यावर्षीदेखील तीच तारीख असू शकते. वॉर्ड रचनेचा अहवाल तयार करण्यासाठी १५ ते २० दिवस लागतील. त्याला मंजुरी मिळण्यासाठी अंदाजे आठवडा लागेल. मंजुरी मिळाल्यानंतर वॉर्ड हद्दीसंबंधी व लोकसंख्या रचनेप्रकरणी हरकती, सूचना, आक्षेप मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी घेण्यासाठी आठवड्याचा कालावधी लागेल. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बदल होऊन वॉर्ड सोडतीची तारीख निश्चित होईल. या प्रक्रियेला जानेवारी महिना लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
वॉर्ड रचनेच्या कामाची लगबग
By admin | Published: January 02, 2015 12:27 AM