परसोडा : परिसरातील बोरसर, भिवगाव, विनायकनगर, सवंदगाव, संजय पूरवाडी शिवराई, गोळवाडी, दहेगाव, राहेगाव येथील सुमारे आठशे कामगार कामासाठी दररोज औरंगाबादला ये-जा करतात. परंतु, गेल्या आठ महिन्यांपासून रेल्वे बंद असल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिन्यापूर्वी रेल्वेसेवा सुरू झाली, पण परसोड्यातील रेल्वे थांबा बंद केल्याने कामगारांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
परसोडा हे निजामकालीन रेल्वे स्थानक असून, या स्थानकावर पहिले मोसंबीच्या रेल्वेगाड्या भरून जात होत्या. परंतु, रेल्वे प्रशासनाने या गावाकडे दुर्लक्ष केल्याने गावांचा विकास थांबला आहे. कारण, रेल्वे सुरू झाली तर येथील जवळपास हजार कामगार औरंगाबादला जाऊन नियमित काम करतात. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे बहुतांश कामगारांचे रोजगार हिरावल्याने त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. त्यातच येथील रेल्वे थांबा सध्या बंद करण्यात आल्याने नागरिकांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने कामगार आर्थिक अडचणीत आला आहे.
या स्थानकावरून परसोडा परिसरातील दहा ते पंधरा गावांतील मजूर कामाच्या शोधात औरंगाबादला येतात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे बंद पडल्याने कामाच्या शोधात जाणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने येथे रेल्वे थांबण्यास सुरुवात करावी, नसता आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच श्याम राजपूत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदामसिंग छानवाल, सोसायटीचे चेअरमन साईनाथ कवडे, माजी सरपंच रामभाऊ कवडे, राजू छानवाल, प्रतापसिंग मेहेर, सुचरण छानवाल, संदीप धाडबळे, बाळू शिंदे, गणेश कवडे, नीलेश राजपूत, बाळू कवडे आदींनी दिला आहे.
--- कॅप्शन : परसोडा रेल्वे स्थानक गावाच्या दिशेने व्हावे, यासाठी रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करताना सुदामसिंग छानवाल, साईनाथ कवडे आदी.