‘पुढचा मुख्यमंत्री मीच हे सांगायला फडणवीसांकडे वेळ आहे, पण राज्यासमोरचे कुठलेच प्रश्न सोडवायला वेळ नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 11:48 PM2018-10-09T23:48:21+5:302018-10-09T23:49:30+5:30
‘पुढचा मुख्यमंत्री मीच असे स्वप्नरंजन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ आहे; पण महाराष्ट्रापुढचे कुठलेच प्रश्न सोडवायला वेळ नाही’ अशी घणाघाती टीका येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘संविधान बचाव....देश बचाव’ मेळाव्यात केली.
औरंगाबाद : ‘पुढचा मुख्यमंत्री मीच असे स्वप्नरंजन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ आहे; पण महाराष्ट्रापुढचे कुठलेच प्रश्न सोडवायला वेळ नाही’ अशी घणाघाती टीका येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘संविधान बचाव....देश बचाव’ मेळाव्यात केली. याच मेळाव्यात मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सरकारने द्यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनीही ही मागणी मेळाव्यात उचलून धरली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात विभागीय पातळीवरील या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
शरद पवार यांची अनुपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार होता; परंतु ऐनवेळी ते येऊ शकले नाहीत. एका महत्त्वाच्या बैठकीमुळे पवारसाहेब या मेळाव्याला येऊ शकले नाहीत, एवढाच खुलासा अजित पवार यांनी भाषणातून केला.
ही लोकसभेची तयारी का?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सुप्रिया सुळे यांच्या आधी बोलले. नेहमीप्रमाणे त्यांचे भाषण चांगलेच झाले. शेवटी त्यांनी एका हिंदी कवितेचा आधार घेत आपले भाषण रंगवले. याचा आधार घेत सुळे यांनी मिश्कील टिपणी केली, ‘धनंजय मुंडे यांचे भाषण चांगलेच झाले. आज ते हिंदी फार छान बोलताना दिसले. लोकसभेची तयारी करीत आहेत की काय, असे वाटून गेले.’ सुप्रिया सुळे यांनी हसत-हसत केलेल्या या टिपणीवर स्वत: धनंजय मुंडेही गालातल्या गालात हसत राहिले; पण जाहीररीत्या केलेल्या या टिपणीचा राजकीय अर्थ न काढला गेल्यास नवल. बीड लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेची निवडणूक मुंडे भावा-बहिणीत रंगू शकते, अशी चर्चा लगेच सुरू झाली.
नृत्य, नाटिका, माहितीपट....
दुपारी १२ वा. मेळाव्याचा एक भाग म्हणून नृत्य, नाटिका व माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. या सगळ्यांचा केंद्रबिंदू ‘संविधान’ हा होता. स्वत: डॉ. फौजिया खान यांनी याचे लेखन केलेले. विद्यमान सरकार संविधानाचे कसे धिंडवडे काढत आहे, याचा घटनाक्रमच या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्पष्ट करण्यात आला. अगदी लोकशाहीचा चौथा स्तंभही कसा दबावाकडे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावरच ‘संविधान बचाव’ अशी अक्षरे लिहिलेली काळी पट्टी आलेल्या प्रत्येक महिलेला देण्यात येत होती. महिलांनी ही पट्टी आपल्या डोक्याला बांधली होती. अधून-मधून ‘संविधान बचाव....देश बचाव’ या घोषणेने नाट्यगृह दुमदुमून जात होते. संविधान के सम्मान में.... राष्ट्रवादी काँग्रेस मैदान में, नकोरे बाबा मोदी सरकार, अशा घोषणाही निनादत होत्या.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. फौजिया खान यांनी प्रास्ताविक केले. आगामी काळात ‘नको रे बाबा मोदी सरकार’ हे आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केले. ११ आॅक्टोबर रोजी लोडशेडिंगविरोधात जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आपापल्या जिल्ह्यात आंदोलन करण्याचा आदेशही त्यांनी दिला. व पेट्रोलपंपांवरील मोदी यांच्या फोटोखाली काळी पट्टी लावून गॅस सिलिंडरच्या वाढत्या भावाबद्दलचा राग व्यक्त करा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले.
प्रारंभी, राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर औरंगाबाद शहर राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मेहराज पटेल यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले, तर सक्षना सलगर यांनी संविधान बचावची प्रतिज्ञा म्हटली. दिल्ली येथील कार्यक्रमात शरद पवार यांनी डॉ. फौजिया खान यांना दिलेली मशाल आज अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या हस्ते महिला पदाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात आली. नंतर सुरेखा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
घाईघाईत ठराव मंजूर
या मेळाव्यात महागाई, सातबा-यावर अहिल्यादेवींचा फोटो, महिलांची असुरक्षितता, रोजच वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना, शेतीमालाला हमीभाव, आदी ठराव घाईघाईतच मंजूर करण्यात आले. औरंगाबाद जिल्हा राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा छाया जंगले पाटील, सुरेखा लहाने, भाग्यश्री क्षीरसागर, रेखा कदम, वीणा खरे, भावना नखाते आदींनी हे ठराव मांडले. या मेळाव्यात सत्कारालाही फाटा देण्यात आला होता.
माजी मंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, जयप्रकाश दांडेगावकर, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. प्रकाश गजभिये, गणेशराव दुधगावकर, माजी आ. प्रा. किशोर पाटील, संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे, सुधाकर सोनवणे, काशीनाथ कोकाटे, रंगनाथ काळे, कदीर मौलाना, शहाजहा फेरोज आदींची मंचावर उपस्थिती होती.
सरकार उलथून टाका
प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडला. यासंदर्भातील पुरुषी विकृतीला सरकारच पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला, तर मायबाप जनताच संविधान वाचवू शकेल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. राम कदम यांच्या अलीकडील वक्तव्याचा सुळे आणि अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘तू समजतोस काय? सत्तेची माज आली का? नशा चढली का? धुंदी आली का? अशा शब्दांत पवार यांनी खडसावले. मुख्यमंत्र्यांना किती शेतकºयांच्या आत्महत्या पाहिजे म्हणजे ते मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करतील, असा जळजळीत सवालही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला कळत नाही, दिसत नाही, ऐकायला येत नाही. आता केंद्रातले व राज्यातले सरकार उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले.