औरंगाबाद : घाटी रुग्णालयात हजारो रुपये खर्चून लावलेले वॉटर कूलर भंगारात जमा झाले आहेत. त्यामुळे वॉटर कूलर शोभेची वस्तू ठरत असून, घोटभर थंड पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे.
अपघात विभागातील चारही वॉटर कूलर नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची सुरुवात होऊनही त्यांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाटली घेऊन थेट रुग्णालयाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागत आहे. पाणी कुठे मिळते, याची विचारणा करीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरण्याची नामुष्की ओढावत आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे घाटी प्रशासनाने चक्क किफायतशीर दराच्या नावाखाली परिसरात पाणी विकण्याची परवानगी दिली आहे. पाणी आवश्यक असल्याने नाईलाजाने पाणी विकत घेण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर येत आहे.
हजारो रुपयांच्या कूलरची अवस्था सुधारण्याऐवजी विकतचे पाणी घेण्यासाठी नातेवाईकांना प्रवृत्त केले जात आहे. वॉटर कूलरमधून थंड आणि स्वच्छ पाणी मिळाले, तर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही, असे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.