औरंगाबाद : राज्य सरकार स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींचा सोमवार शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला. उत्सुकता आणि उत्कंठता शिगेला पोहोचली, अनेकांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार म्हणून जल्लोषाची तयारी केली. मात्र, शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाºया संख्याबळाचा आकडा जुळविता आला नसल्याची बातमी सायंकाळी ७.३० वाजेनंतर आली आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या जल्लोषावर विरजण पडले.
राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला काल राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तसेच सोमवारी दिवसभरातील घडामोडी लक्षात घेता शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळेल, असा विश्वास शहरातील शिवसैनिकांना वाटत होता. त्यामुळे सायंकाळच्या वेळी जल्लोषाची तयारी करण्यात आली होती.
टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर परिसरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जल्लोषासाठी चौकात जमले होते. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार या आनंदामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रस मिळून ‘महाशिवआघाडी’ स्थापन होईल अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती. दिवसभर नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. कोणत्याही परिस्थितीत आता राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार या ठाम विश्वासात शिवसैनिक होते.
मुंबईतील मातोश्री, सिल्व्हर ओक, बांद्रा येथील पंचतारांकित हॉटेल आणि शेवटी राजभवन येथील सर्व घडामोडी पाहण्यासाठी राजकीय वर्तुळ टीव्ही, आॅनलाईन बातम्या आणि सोशल मीडियात गुंतलेले होते. वेगवेगळे निष्कर्ष आणि अनुमान लावण्यात समर्थकांमध्ये पैजा लागल्या होत्या. सायंकाळी ७.३० वाजेची वेळ जसजशी जवळ आली, तशी शहरातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस समर्थकांनी टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर, गुलमंडी परिसरात गर्दी केली; परंतु शिवसेनेने बहुमत आणि समर्थनाचा आकडा राज्यपालांकडे सादर करण्याऐवजी सरकार स्थापण्यासाठी मुदत मागितल्याचे वृत्त येताच कार्यकर्त्यांच्या जल्लोषावर विरजण पडले. राज्यपालांकडे बहुमताचा आकडा वेळेत देता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी मुदत देण्यात आल्यामुळे आता नव्या समीकरणांकडे शहराचे लक्ष लागले आहे.
भाजपने केली होती निषेधाची तयारीशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रस मिळून ‘महाशिवआघाडी’च्या बहुमताचा आकडा जर राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात शिवसेना यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले असते तर भाजपने क्रांतीचौकात निषेध करण्याची तयारी केली होती; परंतु भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने काहीही विद्रोही भूमिका न घेण्याचे आदेश दिल्यामुळे निषेध कार्यक्रम गुंडाळल्याची माहिती भाजपच्या गोटातून देण्यात आली.