औरंगाबाद : कोरोनामुळे समाजातील बहुतांश घटकांवर विपरीत परिणाम झाला असून, अनेकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने पारंगत असलेला परंपरागत व्यवसाय सोडून इतर व्यवसाय करण्याची वेळ ओढवली आहे. सुंदर हस्ताक्षराची नैसर्गिक देणगी लाभलेल्या पेंटरवर उदरनिर्वाहासाठी अंत्यविधीचे साहित्य विकण्याची वेळ आली आहे.
मुकुंदवाडीतील प्रदीप तोडकर रंगछटा चितारण्यात निपुण आहे. डिजिटल प्रिंटिंगमुळे फलक, विवाह समारंभ व मोर्चा, निदर्शनाचे बॅनर बनविण्याचे काम संपुष्टात आले. काळाच्या ओघात दुकानाचे शटर, पाटी रंगविण्याच्या आणि नावे टाकण्याच्या कामालाही कोरोना महामारीने ब्रेक दिलाय. रंगातून चितारलेले बोर्ड अनेक वर्षे टिकाऊ असतात म्हणून बहुतांश दुकानदार, कारखानदार व सरकारी कामे पेंटरकडूनच केली जातात. परंतु आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे घंटो का काम मिनिट में अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे पेंटरची हातावर असलेली कामे हळूहळू कमी होत आहेत. पूर्वी सिनेमा घरासमोर लावण्यात येणाऱ्या चित्रपटाचा बोर्ड चुना मारून त्यावर वाॅटर कलर किंवा निळ, गेरू वापरून चित्रपटाचे नाव आकर्षक रूपात लिहिले जायचे, तो काळ गेला. आकर्षक पोस्टर आणि आता डिजिटल बोर्ड फलकाने मुसंडी मारल्यामुळे पेंटरच्या व्यवसायाला उतरती कळा आली. जेमतेम दुकानावरील फलक बनविण्याचे काम किंवा हॉटेल, ऑफिस, दुकान, शाळा, महाविद्यालय येथे भिंतीवर आकर्षक सुविचार व सूचनाफलक लिहिण्याचे काम पेंटरकडे आले. लाॅकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असून हाही कामाचा सोर्स निघून गेला आहे.
कामासाठी भटकंती करणारा तोडकर मिळेल ते काम करू लागला. लाॅकडाऊनमुळे आठवड्यात एखाद दोन दिवस भरू लागले. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातच मुकुंदवाडीत अंत्यविधीचे साहित्य विक्रीचे दुकान असलेल्या भाई राजाकडे काम करण्याचा सल्ला मित्रांनी दिला. कारण हे दुकान २४ तास सुरू असते. त्यामुळे रोजगार मिळाला आणि दीड वर्षापासून हंगामी रोजगार मिळत आहे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. कुटुंब काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील ही भीती आता मनात ठेवली नाही. बेरोजगार झालेल्या पेंटरला रोजगार मिळाला, यामुळे पेंटर व त्याच्या मित्रांना समाधान लाभल्याचे दिसत होते.