खुलताबाद तालुक्यात सुमारे दोनशेच्या आसपास कटिंग सलून दुकाने आहेत. दिवसातून किमान पाच ते सहा तास ही दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष शिवाजी घोडके यांनी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिकांचे दुकाने बंद आहेत. त्यामुळे या समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यापैकी बरेच नाभिक व्यावसायिक हे भाडेतत्त्वावर आहेत. त्यामुळे आता दुकानाचे भाडे कसे भरावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सलून बंद असल्यामुळे मुलांचा शिक्षण खर्च, बँकेचे हप्ते भरणे मुश्कील झाले आहे. शासनाने सलून चालकांना नियम व अटी घालून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा सरसकट अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवाजी घोडके यांनी केली आहे.
सलून बंद असल्याने नाभिक बांधवांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:04 AM