छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने अपघातासंदर्भाने नव्याने संमत केलेल्या कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट चालक, विविध राज्यांमधील चालक संघटनांनी बेमुदत संप पुकारला. त्याचा सर्वाधिक फटका पेट्रोल, डिझेल वाहतुकीवर झाला. मनमाडमध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून इंधनाची वाहतूक करणाऱ्या दीड हजारपेक्षा अधिक वाहनचालकांनी यात सहभाग नोंदवला. त्यामुळे पंपावर इंधनाचा पुरवठाच झाला नाही.
ट्रक चालकांनी सोमवारपासून आंदोलन सुरु केले. सोमवारी सायंकाळनंतर शहरात याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. बहुतांश पंपांवर सायंकाळी ५ वाजेनंतर वाहनचालकांनी पेट्राेल, डिझेल भरण्यासाठी गर्दी केली. परिणामी, वाहनांच्या रस्त्यावर रांगा आल्या. वादातून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता दिसताच पोलिस बंदोबस्त देण्याची वेळ आली. क्रांती चौकातील एक पेट्रोल पंप रात्री नऊ वाजता बंद झाला. त्यानंतर सेंट्रल नाका, पोलिस पंप व हर्सूल पंपावर झुंबड उडाली. तेथेही रात्री उशिरा पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले.