गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना (कॉ.प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीतून) : देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून यासाठी जागर करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीचा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारालाही आपली भूमिका काय यावरही त्याला भाष्य अथवा लिहिण्यावर निर्बंध आणले जात असल्याने याविरूध्द जागर करण्याची गरज असल्याचा सूर रविवारी श्रमिक साहित्य संमेलनातील परिसंवादात उमटला.सेंट्रल आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचे रविवारी उदघाटन झाले. दोन दिवस चालणाºया या परिसंवादात रविवारी कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सद्यस्थिती यावर परिसंवाद झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, कवी मंगेश काळे, नाट्यलेखक राजकुमार तांगडे, कवयित्री धम्म संगिनी, कादंबरीकार श्रीरंजन आवटे यांनी सहभाग घेतला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जयदेव डोळे होते.आपल्या लिहिण्यावर, बोलण्यावर गदा आणली जात आहे. सध्याची स्थिती फारच भयावह निर्माण झाली असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम सध्या सुरू असल्याने श्रमिकांनी याविरूध्द आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे श्रीरंजन आवटे म्हणाले.जे सध्या प्रश्न विचारत आहेत, अशांची कोंडी केली जात आहे. फारच डोईजड झाल्यास त्यांची हत्या करण्यातही फॅसिस्ट विचारसरणीचे लोक मागे पुढे पाहत नसल्याने ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश सारखे बळी जात आहेत. देशासाठी सुध्दा धोक्याची घंटा असल्याचे याविरूध्द आवाज उठविणे गरजेचे असल्याचे नागपूर येथील कवयित्री धम्म संगिनी म्हणाल्या. प्रत्येक वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे मत कवी मंगेश काळे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्यांचा आवाज असलेली माध्यमेही विकली जात असल्याने देशात काय घडते हे कसे दाखवायचे, हे ठरविले जात आहे. आणि आपण सुध्दा हतबलपणे बघत आहोत हे दुर्दैवी असल्याचे काळे म्हणाले. पत्रकारांनाही आपले हक्क माहीत नसल्याची खंत व्यक्त करीत ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे म्हणाले की, पत्रकारिता शिकतानाच त्यात संविधानाचा एक वियष असावा.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी केंद्र शासनाचा चांगलाच समाचार घेतला. देशाच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील, असे म्हणाले. आपण विभक्त असलेले लोक आहोत. आपण संघटित नसल्याचा फायदा सध्याची व्यवस्था घेत असल्याने आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचे डोळे म्हणाले. सरकार मधील लोक आपले अपयश लपविण्यासाठी लेखक, विचारवंताचे खून करीत आहेत. हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे डोळे म्हणाले. देशातील गरिबी, दारिद्र्य, रोजगार याविषयी कुठलाच कार्यक्रम शासनाकडे नाही. यामुळे हे सरकार धर्मव्यवस्थेच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादत असल्याचे डोळे यांनी खंत व्यक्त केली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागर करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:52 AM